शिक्रापूर (पुणे) : जातेगाव बुद्रुक (ता. शिरुर) येथे रात्रीच्या सुमारास बाहेरून लावलेले दरवाजाचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी चोरी करताना ज्येष्ठ महिलेवर प्राणघातक हल्ला केला. या मारहाणीत महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सोमवारी (ता. 22) मध्यरात्री हि घटना घडली.
कृष्णाबाई ज्ञानेश्वर इंगवले (वय ७६, रा. जातेगाव बुद्रुक ता. शिरुर), असे मृत्यू झालेल्या ज्येष्ठ महिलेचे नाव आहे. याप्रकरणी सून नंदा इंगवले यांनी शिक्रापूर पोलिसांत फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जातेगाव बुद्रुक येथील नंदा इंगवले या जेवण केल्यानंतर शेजारील घरात झोपण्यासाठी गेल्या होत्या. त्यांची सासू जुन्या घरात झोपली असल्याने नंदा यांनी जुन्या घराच्या सुरक्षा दरवाजाला कुलूप लावले. सकाळी नंदा या सासूबाई यांच्या जुन्या घराच्या दरवाजाचे कुलूप उघडण्यासाठी गेल्या. कुलूप तुटलेले दिसल्याने त्यांनी सासूबाईंना हाक मारली. मात्र, प्रतिसाद न आल्याने त्यांनी आतमध्ये पाहिले असता कृष्णाबाई या रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडलेल्या दिसल्या.
नंदा इंगवले यांनी सदरची माहिती घरच्यांना व शिक्रापूर पोलिसांना दिली. त्यानुसार पोलीस पथकासह घटनास्थळी दाखल झाले. यावेळी पोलिसांनी पाहणी केली. कृष्णाबाई इंगवले यांचा चोरट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याचे समोर आले. इंगवले यांच्या घरातून दोन तोळे दागिने, तीन हजार रुपये रोकड, असा ऐवज लुटला. त्यानंतर चोरट्यांनी शेजारील मोहन तांबे व दत्तात्रय फणसे यांच्या घरात हात साफ केले.
दरम्यान, घटनास्थळी श्वान पथकाला पाचारण केले असून चोरट्यांवर खुनासह चोरीप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या घटनेने शिरूर तालुक्यात घबराट पसरली आहे.