थेऊर, (पुणे) : थेऊर (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील महातारी आई मंदिराजवळ एक अपघात झाला. या अपघातात २४ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (ता. १२) दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडली. मात्र, हा नेमका अपघात होता की घातपात याचा तपास लोणी काळभोर पोलिसांनी सुरु केला आहे.
अख्तर बिबन सय्यद (वय २४, रा. थेऊर गाव, थेऊर, ता. हवेली) असे अपघातात मृत्यू झालेल्या २४ वर्षीय तरुणाचे नाव आहे. नेमका त्याचा अपघात कसा झाला याची माहिती अद्याप मिळू शकली नसून लोणी काळभोर पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, थेऊर चौकात भालसिंग यांचे केक शॉपचे दुकान आहे. यावेळी भालसिंग याच्या मित्राकडून सय्यद याने चारचाकी गाडी घेऊन महातारी आई परिसराकडे घेऊन गेला होता. यावेळी तब्बल दोन ते तीन तासाने महातारी आई देवीच्या दर्शनाला गेलेल्या दोन भाविकांनी चौकात येऊन या अपघाताची माहिती दिली.
यावेळी त्याठिकाणी असलेले परिसरातील नागरिकांनी जाऊन पाहणी केली असता बलेनो ही चारचाकी गाडी चक्काचूर झाल्याची दिसून आली. त्यामध्ये जाऊन नागरिकांनी पाहणी केली असता त्यामध्ये कोणीही आढळून आले नाही तर गाडीच्या काचा या फुटलेल्या अवस्थेत दिसून आल्या.
दरम्यान, यावेळी अख्तर हा गाडीच्या बाजूलाच निपचित पडलेल्या अवस्थेत दिसून आला. त्याला नागरिकांच्या मदतीने साडेपाच वाजण्याच्या सुमारास विश्वराज हॉस्पिटल या ठिकाणी दाखल करण्यात आले. यावेळी उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या घटनेचा लोणी काळभोर पोलिसांनी पंचनामा केला असून, पुढील कार्यवाहीसाठी मृतदेह ससून रुग्णालयात पाठवला आहे.
तरुणाच्या मृत्यूने गावात हळहळ..
अख्तर सय्यद या तरुणाच्या अचानक झालेल्या अपघाती मृत्युमुळे थेऊर व परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. सय्यद याचा मनमिळावू स्वभाव असल्याने त्याचे थेऊरसह परिसरात हजारो मित्र होते. त्याच्या जाण्याने त्याच्या मित्रमंडळीवर शोककळा पसरली आहे.