पुणे – वाघोली ते शिरूर दरम्यान दुमजली पुलासह १८ पदरी रस्त्याच्या कामासाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार संस्थेसाठीची निविदा प्रक्रिया लवकर व्हावी यासाठी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून सदर संस्थेसाठीची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे.
याबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून लवकरच कार्यारंभ आदेश देण्यात येणार आहे. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून प्रतीक्षेत असलेल्या या रस्त्याचा डीपीआर बनविण्याच्या कामाला सुरुवात होणार आहे.
पुणे – नगर राष्ट्रीय महामार्गावर सातत्याने होणारी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी खासदार डॉ. कोल्हे यांचे प्रयत्न सुरू होते. भूसंपादनात येणाऱ्या अडचणी विचारात घेऊन खासदार डॉ. कोल्हे यांच्या सूचनेनुसार नागपूरच्या धर्तीवर एलिव्हेटेड रस्ता बांधण्यासाठी सार्वजनिक बांधकाम (राष्ट्रीय महामार्ग) विभागाच्या माध्यमातून सादरीकरण करण्यात आले होते. त्यानुसार डीपीआर बनविण्याच्या कामाला सुरुवात झाली होती.
परंतु भविष्यातील वाढती गरज लक्षात घेऊन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून याठिकाणी दुमजली पुलासह १८ पदरी रस्ता बांधण्याची घोषणा केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी केली होती.
या महामार्गाच्या कामाचे सादरीकरण तत्कालिन उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत पार पडले होते. मात्र त्यानंतर अपेक्षित गतीने काम पुढे सरकत नसल्याने खासदार डॉ. कोल्हे यांनी केंद्रीयमंत्री गडकरी यांना पत्र पाठवून लक्ष घालण्याची मागणी केली होती.
त्यानंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार (पीएमसी) निवडीसाठीच्या निविदा प्रक्रियेला मंजुरी मिळाली.
त्यानुसार पीएमसी निवडीसाठीच्या निविदा प्रक्रिया पार पडली असून लवकरच कार्यारंभ आदेश संबंधित सल्लागार संस्थेला देण्यात येणार असून त्यानंतर डीपीआर बनविण्याच्या कामाला सुरुवात होईल. त्यामुळे आता अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला पुणे नगर रस्त्यावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटण्याच्या दिशेने पाऊल पडले आहे.
या संदर्भात खासदार डॉ. अमोल कोल्हे म्हणाले की, राज्यात सर्वाधिक राष्ट्रीय महामार्गांची कामे शिरूर लोकसभा मतदारसंघात होणार असून अखेरच्या क्षणी कामात बदल होत राहिल्याने विलंब होत होता.
त्यामुळे नितीन गडकरी यांना पत्र पाठवून मतदारसंघातील तीनही राष्ट्रीय महामार्गांची कामे लवकर सुरू व्हावी यासाठी लक्ष घालण्याची मागणी केली होती. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत गडकरी यांनी दिलेल्या निर्देशानुसार वाघोली ते शिरूर दरम्यान दुमजली पुलासह १८ पदरी रस्त्याच्या कामासाठी निविदा प्रक्रिया होऊन पीएमसी संस्था निश्चित झाली आहे.
लवकरच डीपीआर बनविण्याचे काम सुरू होईल अशी अपेक्षा आहे. त्याचबरोबर पुणे नाशिक एलिव्हेटेड रस्त्याची पीएमसी संस्थेची निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन डीपीआर बनविण्याचे काम सुरू झाले आहे, तर तळेगाव चाकण शिक्रापूर एलिव्हेटेड रस्त्याच्या पीएमसी संस्थेसाठीची निविदा जाहीर झाली आहे.
त्यामुळे लवकरच ही सर्व महामार्गांची कामे मार्गी लागतील असा विश्वास खासदार डॉ. कोल्हे यांनी व्यक्त केला.