उरुळी कांचन, (पुणे) : येथील कस्तुरबा मातृ मंडळाच्या वतीने उरुळी कांचन (ता. हवेली) येथे महिला मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन शनिवारी (ता. 28) करण्यात आले होते. महिलांच्या शारीरिक, मानसिक आणि भावनिक सामर्थ्याची जाणीव करून त्यांना सक्षम बनवणे हा स्पर्धेचा उद्देश होता अशी माहिती कस्तुरबा मातृ मंडळाच्या अध्यक्षा सुरेखा भन्साळी यांनी दिली.
या स्पर्धेत 18 ते 90 वयोगटातील महिलांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. विशेषतः परिसरातील 70 वर्षांवरील महिलांनीही अतिशय उत्साहाने या स्पर्धेत सहभाग नोंदवला. तत्पूर्वी भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली अर्पण केली. त्यांच्या देशाच्या आर्थिक धोरणांमध्ये केलेल्या योगदानाचा गौरव करण्यात आला.
सदर स्पर्धेची सुरुवात सकाळी साडेसात वाजता हनुमान मंदिर येथून झाली. प्रत्येक वयोगटातील तीन प्रमुख पारितोषिके जाहीर करण्यात आली, तसेच सर्व सहभागी महिलांना विशेष रंगाचे दुपट्टे देण्यात आले. मुख्य बाजारपेठ, महात्मा गांधी रोड, मोटर स्टॅन्ड, तळवाडी, एलाईट चौक, आश्रम रोडने समारोप हनुमान मंदिर येथे झाला. स्पर्धेची सांगता करण्यात आली. या स्पर्धेसाठी गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, जिल्हा नियोजन मंडळाचे माजी सदस्य, अधिकारी, उरुळी कांचन पतसंस्थेचे व महात्मा गांधी सर्वोदय संघाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
दरम्यान, हि स्पर्धा यशस्वी होण्यासाठी कस्तुरबा मातृ मंडळाच्या अध्यक्षा सुरेखा भन्साळी, सुशीला मेटे, पुष्पाताई पदवड, जयश्री बेदरे, रश्मी कुलकर्णी, संगीता भालके, आशा कांचन, प्रिया बलडोटा, स्वाती चौधरी, छाया नहार, उज्वला लोखंडे, राजश्री शितोळे, मीनल फुलपगर, राणी चोरडिया यांनी परिश्रम घेतले. यावेळी प्रतिभा कांचन, भोर, अरुणा हेंद्रे यांचा उत्स्फूर्त सहभाग दर्शवला. महात्मा गांधी सर्वोदय संघ, पीटी शिक्षक, एनसीसी व आरएसपी विद्यार्थी यांच्यासह उरुळी कांचन ग्रामपंचायत, स्थानिक पोलिस स्टेशन आणि उरुळी कांचन ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था यांचा विशेष पाठिंबा मिळाला.