पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या 10वी(SSC )आणि 12वी (HSC) पुरवणी परीक्षेचा निकाल उद्या, म्हणजेच 15 जुलै 2026 रोजी दुपारी ठीक 1 वाजता ऑनलाईन पद्धतीने जाहीर केला जाणार आहे. मुख्य परीक्षेत यश न मिळालेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाचवण्यासाठी जून-जुलै दरम्यान ही परीक्षा घेण्यात आली होती. आता या परीक्षेच्या निकालाकडे हजारो विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांचे लक्ष लागले आहे.

निकाल कसा पाहावा?

वेबसाईटला भेट द्या: विद्यार्थ्यांनी बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन निकाल पाहावा.
लॉगिन तपशील: निकाल पाहण्यासाठी उमेदवारांना आपला सीट नंबर (Seat Number) आणि आवश्यक माहिती अचूक भरावी लागेल.
प्रिंट जपून ठेवा: ऑनलाईन निकाल स्क्रीनवर दिसताच त्याची डिजिटल प्रत डाऊनलोड करून किंवा प्रिंट काढून आपल्याकडे ठेवावी.
विद्यार्थ्यांना त्यांची मूळ गुणपत्रिका आणि इतर महत्त्वाची कागदपत्रे पुढील काही दिवसांत त्यांच्या संबंधित शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयांमधून दिली जातील.
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी बोर्डाने अत्यंत वेगाने उत्तरपत्रिका तपासणीचे काम पूर्ण केले आहे. बोर्डाकडून 10वीची परीक्षा: 16 जून ते 30 जून या कालावधीत पार पडली.12वीची परीक्षा: 16 जून रोजी सुरू होऊन 8 जुलै रोजी संपली.
महाराष्ट्रातील पुणे, मुंबई, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या 9 विभागीय बोर्डांच्या अंतर्गत परीक्षा दिलेल्या सर्व विद्यार्थ्यांचा निकाल एकाच वेळी जाहीर केला जाणार आहे . सर्व परीक्षा केंद्रांवर परीक्षा अत्यंत पारदर्शक आणि सुरळीत पार पडल्याचे बोर्डाकडून स्पष्ट करण्यात आले आहे







