पुणे : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर आज पहाटेच्या सुमारास दुर्दैवी अपघात घडल्याची घटना समोर आली आहे. लांजा रेस्ट हाऊस परिसराजवळ गोव्याहून मुंबईकडे जाणाऱ्या एका कारने रस्त्याच्या कडेला पार्क केलेल्या डंपरला पाठीमागून जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील 4 जणांचा जागीच मृत्यू झाला असून, अन्य 2 जण गंभीर जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, हे दुर्दैवी कुटुंब मुंबईतील आग्रीपाडा परिसरातील रहिवासी आहे. गोव्यात सुट्ट्यांचा आनंद उपभोगून हे सर्वजण कारने मुंबईला परतत होते. लांजा परिसरात पोहोचल्यावर चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि भरधाव कार थेट डंपरवर जाऊन आदळली. हा अपघात इतका भयानक होता की, कारच्या पुढील भागाचा पूर्णपणे चक्काचूर झाला. मृतकांमध्ये दोन महिला, एक पुरुष आणि एका चिमुरड्याचा समावेश आहे.

धडकेचा मोठा आवाज ऐकून परिसरातील नागरिक आणि हायवे पोलीस तातडीने मदतीसाठी धावून आले. त्यांनी स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने जखमींना तातडीने गाडीबाहेर काढले. जखमींची प्रकृती चिंताजनक असून त्यांना उपचारासाठी लांजा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या अपघातामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली होती. मात्र, पोलिसांनी अपघातग्रस्त वाहन रस्त्यावरून बाजूला हटवून वाहतूक पुन्हा सुरळीत केली. लांजा पोलिसांनी या घटनेची नोंद केली असून, अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी पुढील तपास सुरू केला आहे.







