नागपूर: कौटुंबिक विरोधामुळे विवाहाचे स्वप्न भंग झाल्याने एका प्रेमीयुगुलाने टोकाचे पाऊल उचलल्याची हृदयद्रावक घटना नागपूर जिल्ह्यात समोर आली आहे. गेल्या 4 वर्षांपासून एकमेकांच्या प्रेमात असलेल्या या तरुण-तरुणीने कुटुंबीयांकडून लग्नास नकार मिळाल्यानंतर आत्महत्येचा प्रयत्न केला. या घटनेत 21 वर्षीय विशाल जावडे याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून, 20 वर्षीय तरुणीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

माहितीनुसार, विशाल आणि संबंधित तरुणी यांच्यात गेल्या चार वर्षांपासून प्रेमसंबंध होते. त्यांनी विवाह करण्याची इच्छा दोन्ही कुटुंबीयांसमोर व्यक्त केली होती. मात्र, विविध कारणांमुळे दोन्ही बाजूंकडून या विवाहाला विरोध करण्यात आला. रविवारी या मुद्द्यावरून दोन्ही कुटुंबांमध्ये वाद झाला.

सोमवारी दुपारी हे दोघे वानाडोंगरी-संगम गाव मार्गावरील एका निर्जन ठिकाणी गेले. तेथे त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. काही वेळानंतर स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास हा प्रकार आला. त्यांनी दोघांना बेशुद्ध अवस्थेत उपचारासाठी शालिनीताई मेघे रुग्णालयात दाखल केले.
रुग्णालयात उपचार सुरू असताना रात्री उशिरा विशालचा मृत्यू झाला. तरुणीची प्रकृती गंभीर असून तिच्यावर अतिदक्षता विभागात (ICU) उपचार सुरू आहेत.







