पुणे : केंद्र सरकारच्या मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा मिळणार आणि ते भाजप-एनडीएसोबत जाणार, अशा चर्चांनी महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडवून दिली आहे.यामुळे महाविकास आघाडीत फूट पडणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात होता. या सर्व चर्चांना पूर्णविराम देत राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरदचंद्र पवार) नेत्या, खासदार सुप्रिया सुळे यांनी पक्षाची अधिकृत भूमिका स्पष्ट केली आणि निर्माण झालेला सस्पेन्स संपवला आहे .

सुप्रिया सुळे यांनी सांगितले की, “आम्ही महाविकास आघाडी आणि ‘इंडिया’ आघाडीसोबत पूर्णपणे एकजूट आहोत. आघाडीत कोणताही गैरसमज पसरू नये म्हणून मी स्वतः शिवसेना नेते संजय राऊत, काँग्रेस नेते सतेज पाटील आणि आमचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्याशी सविस्तर चर्चा केली आहे असे त्या म्हणाल्या.

भाजपला पाठिंबा देण्याच्या वृत्ताचे खंडन करताना त्या म्हणाल्या की, केंद्राचे नवीन विधेयक अद्याप आमच्या हातात आलेले नाही. ते विधेयक आल्यानंतर आम्ही त्याचा सखोल अभ्यास करू आणि अवघ्या 24 तासांत पक्षाची भूमिका जाहीर करू. विधेयक समोर आल्याशिवाय आणि मतदारसंघांचा नेमका फॉर्म्युला काय आहे हे स्पष्ट झाल्याशिवाय आम्ही कोणताही निर्णय घेणार नाही.

शेवटी, केंद्र सरकारवर निशाणा साधत त्यांनी सांगितले की, जेव्हा आम्ही सरकारला पुनर्रचनेच्या फॉर्म्युलाबद्दल विचारले, तेव्हा त्यांच्याकडे कोणतेही उत्तर नव्हते. तसेच, संसदेत आलेल्या विधेयकात 50 टक्के जागा वाढीच्या प्रस्तावाचा कोणताही उल्लेख नसल्याने आम्हाला मोठा धक्का बसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.







