पुणे: पुणे जिल्ह्यातील चाकण पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका सहाय्यक पोलीस निरीक्षकाविरोधात लाच मागितल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. जमीन व्यवहाराशी संबंधित तक्रारीवर अनुकूल कारवाई करण्यासाठी 5 लाख रुपये मागितल्या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) संबंधित अधिकाऱ्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे पोलीस दलाच्या कार्यपद्धतीबाबत पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाले आहेत.

माहितीनुसार, तक्रारदार जमीन खरेदी-विक्रीचा व्यवसाय करतात. त्यांच्या आणि त्यांच्या मुलाविरोधात चाकण पोलीस ठाण्यात काही तक्रार अर्ज दाखल झाले होते. या अर्जांची चौकशी सहाय्यक पोलीस निरीक्षक तानाजी शिवाजी कदम यांच्याकडे होती. चौकशीदरम्यान संबंधित प्रकरण निकाली काढण्यासाठी सुरुवातीला 10 लाख रुपयांची मागणी केल्याचा आरोप आहे.

तक्रारदाराला लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी थेट पुणे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानंतर ACB ने संपूर्ण प्रकरणाची पडताळणी केली. चौकशीदरम्यान2.5 लाख रुपयांचा पहिला हप्ता आणि उर्वरित 2.5 लाख रुपये संबंधित काम पूर्ण झाल्यानंतर देण्याचे ठरले होते, अशी माहिती तपासात पुढे आली.

पडताळणीत लाच मागितल्याचे निष्पन्न झाल्यानंतर तानाजी शिवाजी कदम यांच्याविरोधात निगडी पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.







