पुणे: पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील खुटबाव येथे दोन वर्षांच्या चिमुकलीचा पाण्याच्या डबक्यात बुडून मृत्यू झाल्याची अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोही अशोक शिंदे (वय 2) ही मंगळवारी सकाळी घरासमोर अंगणात खेळत होती. त्यावेळी घरातील सदस्य आपल्या दैनंदिन कामात व्यस्त होते. काही वेळाने आरोही अंगणात दिसत नसल्याचे लक्षात येताच कुटुंबीयांनी तिचा शोध घेण्यास सुरुवात केली.

शोधादरम्यान घरासमोरील पाण्याने भरलेल्या खोल डबक्यात आरोही आढळून आली. तिला तातडीने बाहेर काढण्यात आले. मात्र, तोपर्यंत तिचा मृत्यू झाला होता. ही घटना पाहून कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला.

घटनेची माहिती मिळताच यवत पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. पोलीस निरीक्षक संतोष तासगावकर यांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, चिमुकलीचा मृत्यू पाण्यात बुडाल्यामुळे झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनीही प्राथमिक तपासणीत बुडून मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवली आहे.
दरम्यान, मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होण्यासाठी चिमुकलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पुण्यातील ससून रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर पुढील कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
या घटनेनंतर परिसरात विविध प्रकारच्या चर्चांना उधाण आले आहे. मात्र, नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवावा, असे आवाहन यवत पोलिसांनी केले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून अशा दुर्घटना टाळण्यासाठी लहान मुलांवर सतत लक्ष ठेवण्याचे आवाहनही करण्यात येत आहे.







