पुणे : महाराष्ट्र सरकारने राज्यातील बळीराजासाठी दोन अत्यंत महत्त्वपूर्ण आणि धाडसी निर्णय घेतले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना मोठा दिलासा देत, दोन लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी केल्यानंतर आता त्यांची तब्बल 48000 कोटी रुपयांची थकीत वीज बिलं देखील पूर्णपणे माफ करण्याची घोषणा केली आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

शेतकऱ्यांच्या पाठीवरील कर्जाचा आणि थकीत बिलांचा बोजा पूर्णपणे उतरवून, महाराष्ट्राच्या विकासाचा एक नवीन अध्याय सुरू करणे हेच या निर्णयामागील मुख्य ध्येय असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे .बळीराजाच्या वतीने मुख्यमंत्र्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. या सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते. फडणवीस म्हणाले की, राज्याची आर्थिक शिस्त राखणे नेहमीच गरजेचे असते आणि मी त्याबद्दल नेहमीच स्पष्ट भूमिका घेतली आहे.

परंतु, महायुतीतील सहकाऱ्यांशी झालेल्या सविस्तर आणि सकारात्मक चर्चेनंतर, शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी सरसकट कर्जमाफी देणे अत्यंत गरजेचे असल्याचे आम्हाला पटले आणि आम्ही हा निर्णय घेतला.

यावेळी मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. काही विरोधकांना असे वाटत होते की, कर्जमाफी आणि वीज बिलांच्या मुद्द्यांवर त्यांचे राजकीय दुकान नेहमीच चालू राहील. मात्र, हे ‘देवाभाऊंचे’ सरकार आहे आणि आम्ही जे बोलतो, ते प्रत्यक्षात करून दाखवतो, असा टोला त्यांनी लगावला.
आपल्या भाषणात राजकीय हेतू बाजूला सारण्यावर भर देत मुख्यमंत्री म्हणाले की, जर आम्हाला केवळ राजकारणच करायचे असते, तर आम्ही 2029 च्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हा निर्णय घेतला असता. परंतु, बळीराजाच्या कल्याणाच्या आड आम्ही कधीही राजकारण येऊ देणार नाही. राजकारण आणि निवडणुका आपल्या जागी सुरूच राहतील, पण शेतकऱ्यांच्या जीवावर आम्ही कधीही राजकारण करणार नाही, अशी ग्वाही फडणवीस यांनी दिली.







