पुणे: पुण्यातील कात्रज परिसरातून जप्त करण्यात आलेल्या कोट्यवधी रुपयांच्या मेफेड्रॉन प्रकरणाच्या तपासात महत्त्वाची माहिती समोर आली आहे. या ड्रग्ज रॅकेटचे धागेदोरे आता दिल्लीपर्यंत पोहोचले असून, एका नायजेरियन महिलेचा या संपूर्ण प्रकरणाशी संबंध असल्याचा संशय पुणे पोलिसांनी व्यक्त केला आहे. या खुलाशानंतर तपासाला अधिक वेग आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 8 जुलै रोजी कात्रज चौकातील नवीन उड्डाणपुलाखाली प्रशांत सुरेश सावंत (वय 38) याला अटक करण्यात आली होती. त्याच्याकडून सुमारे 2 किलो 895 ग्रॅम मेफेड्रॉन, मोबाईल फोन आणि इतर साहित्य असा एकूण 5 कोटी 79 लाख रुपयांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता.

चौकशीदरम्यान आरोपीने दिल्लीत राहणाऱ्या ‘बेनी’ नावाच्या नायजेरियन महिलेच्या सांगण्यावरून हा अमली पदार्थांचा साठा आणल्याची माहिती दिली. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, ही महिला दिल्लीतून संपूर्ण व्यवहाराचे नियोजन करत होती. तिच्या सूचनेनुसार प्रशांत सावंत हा ड्रग्जचा साठा बंगळुरूला पोहोचवण्यासाठी निघाला होता. मात्र, त्यापूर्वीच पुणे पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने त्याला कात्रज येथे अटक केली.

दरम्यान, आरोपीची पोलीस कोठडी संपल्यानंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. या प्रकरणाचे धागेदोरे आंतरराज्यीय तसेच आंतरराष्ट्रीय नेटवर्कशी जोडलेले असण्याची शक्यता असल्याने पुढील तपासासाठी दिल्ली आणि बंगळुरू येथे जाऊन चौकशी करणे आवश्यक असल्याचा युक्तिवाद सरकारी पक्षाने न्यायालयात केला. न्यायालयाने तो ग्राह्य धरत आरोपीच्या पोलीस कोठडीत वाढ केली आहे.
आता या प्रकरणातील संशयित नायजेरियन महिलेचा शोध घेण्यासाठी पुणे पोलीस दिल्लीमध्ये तपास मोहीम राबविणार असून, या ड्रग्ज रॅकेटमागील संपूर्ण साखळी उघड करण्याचा प्रयत्न सुरू आहे.







