पुणे : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी एक अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. अनेक महिलांचे ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करूनही तांत्रिक कारणांमुळे किंवा कागदपत्रांच्या पडताळणीतील अडचणींमुळे महिन्याचे 1500 रुपयाचे हफ्ते बंद झाले होते. आता अशा सर्व पात्र महिलांच्या अर्जांची पुन्हा एकदा तपासणी सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे बंद झालेले 1500 रुपये पुन्हा खात्यात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी स्वतः ही महत्त्वाची माहिती दिली आहे.

राज्यातील आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबांतील महिलांना सक्षम करण्यासाठी सरकारने ही योजना सुरू केली आहे. ज्या कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी आहे, अशा महिलांना या योजनेचा लाभ मिळतो. परंतु, ई-केवायसीमधील काही त्रुटींमुळे हजारो महिलांचे पैसे रखडले होते.त्याबाबत मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले आहे की, ज्या महिलांनी वेळेत प्रक्रिया पूर्ण केली असूनही त्यांना लाभ मिळालेला नाही, त्यांच्या अर्जांची काटेकोर तपासणी केली जात आहे. कोणत्याही पात्र महिलेवर अन्याय होणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली आहे.

या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी सरकारने महिलांना ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी अनेकदा मुदतवाढ दिली होती. आधी सहा महिन्यांची मुदत दिल्यानंतर ती 31 डिसेंबर 2025 पर्यंत वाढवण्यात आली होती. त्यानंतरही राहिलेल्या त्रुटी सुधारण्यासाठी एप्रिल 2026 पर्यंत शेवटची संधी देण्यात आली होती.
सरकारी आकडेवारीनुसार, ई-केवायसी न केल्यामुळे जवळपास 60 लाखांपेक्षा जास्त महिला या योजनेच्या लाभापासून वंचित राहिल्या आहेत. तसेच, उत्पन्नाची 2.5 लाखांची मर्यादा ओलांडल्यामुळे अंदाजे 13 ते 14 लाख महिलांचे अर्ज अपात्र ठरवण्यात आले आहेत.
अनेक महिलांनी संजय गांधी निराधार योजना आणि लाडकी बहीण योजना अशा दोन्ही ठिकाणी अर्ज केले होते, परंतु त्यांना एकाही योजनेचा निधी मिळत नव्हता. अशा महिलांना दिलासा देत, त्यांना किमान एका योजनेचा लाभ नक्की मिळावा यासाठी सरकार विशेष प्रयत्न करत असल्याचेही मंत्र्यांनी सांगितले आहे. त्यामुळे ज्यांचे हप्ते थांबले आहेत, त्यांना त्यांचे हक्काचे पैसे लवकरच मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.







