पुणे : मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे येथील नगर भूमापन कार्यालयातील एका अधिकाऱ्याविरोधात नागरिकांकडून आलेल्या तक्रारीनंतर आमदार सुनील शेळके यांनी दोन वेळा लेखी तक्रार आणि एक स्मरणपत्र देऊनही अद्याप कोणतीही कारवाई झालेली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे भूमी अभिलेख विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

प्रकाश धादवड हे तळेगाव दाभाडे येथील परिरक्षण भूमापक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या कार्यक्षेत्रात तळेगाव दाभाडे, वडगाव, नवलाख उंब्रे, परंदवडी, सुदुंबरे, उर्से, साते, सोमाटणे, इंदोरी तसेच स्वामित्व योजनेतील काही गावांचा समावेश आहे. नागरिकांशी अयोग्य वर्तन करणे, कामात जाणीवपूर्वक विलंब लावणे, वारंवार कार्यालयात अनुपस्थित राहणे आणि शासकीय कामासाठी नागरिकांना अनेक फेऱ्या मारायला लावणे, अशा तक्रारी आमदार शेळके यांच्याकडे आल्याचे सांगण्यात आले आहे.

तक्रारीनुसार, तळेगाव दाभाडे येथील कार्यालय अनेकदा बंद असल्याने नागरिकांना गैरसोय सहन करावी लागत आहे. तसेच कार्यालयात एका खासगी महिलेमार्फत काम करून घेतले जात असून, शासकीय कागदपत्रे हाताळली जात असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. या माध्यमातून नागरिकांची आर्थिक पिळवणूक होत असल्याचाही दावा करण्यात आला आहे.

या सर्व तक्रारींची दखल घेत आमदार सुनील शेळके यांनी जमाबंदी आयुक्त व भूमी अभिलेख संचालक कार्यालयाकडे संबंधित अधिकाऱ्याची चौकशी करून बदली करण्याची मागणी केली. यासाठी दोन वेळा पत्रे आणि त्यानंतर स्मरणपत्रही देण्यात आले. मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. या प्रकरणी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडेही दाद मागण्याची तयारी नागरिकांनी दर्शविली आहे.
दरम्यान, अपर जमाबंदी आयुक्त ज्ञानेश्वर खिलारी यांनी आमदारांचे पत्र प्राप्त झाले असून, त्यानुसार चौकशी करून लवकरच पुढील कार्यवाही करण्यात येईल, असे सांगितले आहे.







