पुणे : पुण्यातील बाणेर परिसरात मध्यरात्री पायी जाणाऱ्या एका ३२ वर्षीय तरुणाला चार जणांनी दुचाकींवरून येत घेरून लुटल्याची घटना समोर आली आहे. आरोपींनी तरुणाच्या अंगावरील सोन्याचे दागिने जबरदस्तीने काढून घेतल्यानंतर त्याच्या मोबाईलमधून १८ हजार ९९९ रुपये ऑनलाइन पद्धतीने वर्ग करून घेतले. या प्रकरणी बाणेर पोलीस ठाण्यात चार अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुण पॅनकार्ड क्लब रोड परिसरातील एका पेईंग गेस्टमध्ये राहतो. १ ऑक्टोबर रोजी पहाटे सव्वादोनच्या सुमारास तो दोन बॅगा आणि पाठीवर सॅक घेऊन पायी जात होता. विठोबा बाळाजी मुरकुटे गार्डनजवळ पोहोचल्यानंतर त्याला दोन दुचाकींवरून आलेल्या चार जणांनी घेरले. दोन जण समोरून तर दोन जण मागून आल्याने तरुणाला चौघांनी मिळून रस्त्यात अडवले.

आरोपींनी तरुणाला धमकावत त्याच्या हातातील सोन्याचे ब्रेसलेट आणि गळ्यातील सोनसाखळी जबरदस्तीने काढून घेतली. त्यानंतर आरोपींनी त्याचा मोबाईल ताब्यात घेतला. मोबाईलच्या माध्यमातून ऑनलाइन व्यवहार करून १८ हजार ९९९ रुपये वर्ग करून घेतल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. सोन्याचे दागिने आणि ऑनलाइन रक्कम असा एकूण १ लाख २२ हजार ९९९ रुपयांचा मुद्देमाल घेऊन आरोपी दुचाकींवरून पसार झाले.
घटनेनंतर तरुणाने बाणेर पोलिसांकडे तक्रार दाखल केली. पोलिसांनी अज्ञात आरोपींचा शोध सुरू केला असून पॅनकार्ड क्लब रोड तसेच विठोबा बाळाजी मुरकुटे गार्डन परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे. तसेच ज्या यूपीआय आयडीवर पैसे वर्ग करण्यात आले, त्याच्या आधारे आरोपींचा माग काढण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत. या घटनेमुळे रात्रीच्या वेळी या परिसरातील नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.







