डोर्लेवाडी : ग्रामपंचायतींच्या डिजिटल कारभाराचा कणा म्हणून काम करणाऱ्या राज्यातील संगणक परिचालकांचे मानधन पुन्हा रखडले आहे. ग्रामविकास विभागाने मानधन नियमित देण्याचे आश्वासन दिल्यानंतरही अनेक परिचालकांना चार-चार महिने मानधन मिळालेले नसल्याने राज्य संघटनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. सप्टेंबर 2026 पर्यंतचे थकीत मानधन तातडीने अदा करण्याची मागणी संघटनेने केली आहे.

‘आपले सरकार सेवा केंद्र’च्या माध्यमातून ग्रामीण भागातील नागरिकांना विविध शासकीय सेवा ऑनलाइन उपलब्ध करून देण्यापासून ग्रामपंचायतींच्या डिजिटल कामकाजापर्यंत संगणक परिचालक महत्त्वाची जबाबदारी पार पाडतात. नियमित काम करूनही मानधनासाठी महिनोनमहिने प्रतीक्षा करावी लागत असल्याने परिचालकांमध्ये नाराजी आहे. मानधनाच्या विलंबामुळे आर्थिक अडचणी निर्माण होत असून, या प्रश्नासाठी वारंवार निवेदने आणि पाठपुरावा करावा लागत असल्याची संघटनेची तक्रार आहे.

संगणक परिचालकांच्या मानधनाचा प्रश्न यापूर्वी विधानसभेतही उपस्थित झाला होता. जुलै 2026 मध्ये ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी यापुढे संगणक परिचालकांचे मानधन प्रत्येक महिन्याच्या 1 ते 5 तारखेच्या दरम्यान नियमितपणे अदा करण्यात येईल, असे सभागृहात सांगितल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. मात्र, त्यानंतरही मानधन वितरणात नियमितपणा आलेला नसल्याचा दावा संघटनेने केला आहे. त्यामुळे विधानसभेतील आश्वासनाची अंमलबजावणी कधी होणार, असा सवाल परिचालकांकडून केला जात आहे.

कर्मचारी दर्जा आणि किमान वेतनाची मागणीही प्रलंबित आहे. या मागण्यांबाबत धोरणात्मक निर्णय होणे अपेक्षित असले तरी सध्या निश्चित असलेले मानधन वेळेवर मिळणे गरजेचे असल्याची भूमिका संघटनेने घेतली आहे.
संगणक परिचालकांची भूमिका ‘आश्वासन नको, वेळेवर मानधन द्या’
संतोष कुडले, राज्य संघटक तथा पुणे जिल्हाध्यक्ष
“ग्रामपंचायतींच्या डिजिटल कामकाजाची जबाबदारी संगणक परिचालक नियमितपणे पार पाडत आहेत. शासनाने मानधन प्रत्येक महिन्याच्या १ ते ५ तारखेपर्यंत देण्याचे आश्वासन दिले असतानाही चार-चार महिने मानधनासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. कर्मचारी दर्जाचा निर्णय शासनाने घ्यावा; मात्र सध्या निश्चित असलेले मानधन तरी वेळेवर मिळावे. सप्टेंबर २०२६ पर्यंतचे थकीत मानधन तातडीने अदा करून पुढील काळात मानधन नियमित मिळण्याची कायमस्वरूपी व्यवस्था करावी.
थकीत मानधनाच्या मागणीसाठी संतोष कुडले यांनी पुणे येथील RGSA कार्यालयात, तर राज्य प्रसिद्धीप्रमुख तथा पालघर जिल्हाध्यक्ष धनेश भोईर यांनी मंत्रालय, मुंबई येथे निवेदन सादर केले आहे. सप्टेंबरपर्यंतचे थकीत मानधन अदा करण्यासोबतच पुढील काळात दर महिन्याच्या १ ते ५ तारखेपर्यंत मानधन जमा होईल, अशी व्यवस्था करण्याची मागणी करण्यात आली आहे.
शासनाने तातडीने कार्यवाही न केल्यास पुण्यातील RGSA कार्यालयासमोर राज्यभरातील हजारो संगणक परिचालकांना एकत्र करून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा स्पष्ट इशारा राज्य संघटनेने दिला आहे. त्यामुळे आता शासन थकीत मानधनाचा प्रश्न कसा मार्गी काढते, याकडे संगणक परिचालकांचे लक्ष लागले आहे







