पुणे : पुण्यातील डायस प्लॉट परिसरामध्ये एका कंत्राटदाराने (कॉन्ट्रॅक्टर) राहत्या घरी गळफास लावून आयुष्य संपवल असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. खलील शेख असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून पोलीस सध्या या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, हा टोकाचा निर्णय घेण्यामागे पैशांचे मोठे व्यवहार आणि आर्थिक वाद कारणीभूत असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. थकीत रक्कम आणि बुडलेले पैसे या मानसिक त्रासाला कंटाळून त्यांनी हे पाऊल उचलल्याची शक्यता वर्तवली जात आहे

विशेष म्हणजे, आत्महत्या करण्यापूर्वी खलील शेख यांनी एक सुसाईड नोट लिहून ठेवली आहे. इतकेच नाही तर त्यांनी स्वतःचे काही व्हिडिओ देखील शूट केले आहेत. या व्हिडिओजमध्ये त्यांनी अनेक लोकांची नावे जाहीर करत त्यांच्यावर अतिशय गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहेत. हा व्हिडिओ आता तपासाचा मुख्य दुवा ठरण्याची शक्यता आहे.

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि मृतदेह ताब्यात घेतला. पोलिसांनी या प्रकरणी चौकशी सुरू केली असून, अद्याप अधिकृतपणे गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. व्हिडिओ आणि सुसाईड नोटच्या आधारे पोलीस पुढील कायदेशीर कारवाई करत आहेत.







