पुणे: सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI), केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC), रेल्वे भरती मंडळ (RRB), केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) आणि फार्मास्युटिकल्स अँड मेडिकल डिव्हाइसेस ब्युरो ऑफ इंडिया (PMBI) यांनी विविध पदांसाठी भरती जाहीर केली आहे. या भरतीमध्ये अनुभवी व्यावसायिकांपासून ते बारावी उत्तीर्ण, पदवीधर आणि अभियांत्रिकी पदवीधारक उमेदवारांना संधी मिळणार आहे. काही भरतींसाठी अर्ज प्रक्रिया सुरू असून काहींसाठी लवकरच अर्ज सुरू होणार आहेत. त्यामुळे पात्र उमेदवारांनी अंतिम मुदतीची वाट न पाहता अर्ज करणे आवश्यक आहे.

स्टेट बँक ऑफ इंडियाने वेल्थ मॅनेजमेंट विभागातील २०७ पदांसाठी भरती जाहीर केली असून अर्ज करण्याची अंतिम मुदत ५ ऑक्टोबर २०२६ पर्यंत वाढवण्यात आली आहे. झोनल हेड, रिजनल हेड, रिलेशनशिप मॅनेजर-टीम लीड, इन्व्हेस्टमेंट स्पेशालिस्ट, इन्व्हेस्टमेंट ऑफिसर, व्हीपी वेल्थ आणि एव्हीपी वेल्थ या पदांचा यामध्ये समावेश आहे. ही भरती कंत्राटी पद्धतीने असून संबंधित क्षेत्रातील अनुभवी उमेदवारांना प्राधान्य आहे.

UPSC अभियांत्रिकी सेवा परीक्षा २०२७ अंतर्गत सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल तसेच इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन शाखेतील एकूण ४८० पदांसाठी भरती होणार आहे. अर्ज प्रक्रिया १६ सप्टेंबरपासून सुरू झाली असून ६ ऑक्टोबर २०२६ ही अर्जाची अंतिम तारीख आहे. प्राथमिक परीक्षा ३१ जानेवारी २०२७ रोजी, तर मुख्य परीक्षा १८ जून २०२७ रोजी होणार आहे.

PMBI ने फार्मासिस्ट, एक्झिक्युटिव्ह, सिनियर एक्झिक्युटिव्ह आणि असिस्टंट मॅनेजर यांसह विविध पदांच्या १७८ कंत्राटी जागांसाठी भरती जाहीर केली आहे. अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा असून १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत अर्ज करता येईल.
CRPF मध्ये क्रीडा कोट्यातून ५२१ पदांसाठी भरती होणार आहे. हेड कॉन्स्टेबल आणि कॉन्स्टेबल पदांचा यात समावेश आहे. ऑनलाइन अर्ज १२ ऑक्टोबरपासून सुरू होतील आणि ११ नोव्हेंबर २०२६ पर्यंत अर्ज करता येणार आहे.
रेल्वे भरती मंडळाने NTPC अंतर्गत पदवीधरांसाठी ३४७७ पदांची भरती जाहीर केली आहे. यात गुड्स ट्रेन मॅनेजर, चीफ कमर्शियल-कम-तिकीट सुपरवायझर, ज्युनिअर अकाउंट्स असिस्टंट-कम-टायपिस्ट आणि सिनियर क्लर्क-कम-टायपिस्ट या पदांचा समावेश आहे. पदवीधरांसाठी अर्जाची अंतिम तारीख ६ नोव्हेंबर २०२६ आहे. तसेच बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी CEN 07/2026 अंतर्गत १६८८ पदांची भरती होणार असून अर्ज प्रक्रिया १५ ऑक्टोबर ते १३ नोव्हेंबर २०२६ दरम्यान करता येणार आहे.







