मुंबई : अंधेरी पूर्व परिसरात एका राजकीय पक्षाशी संबंधित युवा नेत्याला लैंगिक शोषणाच्या आरोपावरून पोलिसांनी अटक केली आहे. लग्नाचे आमिष दाखवून एका तरुणीचे तीन वर्षे वारंवार लैंगिक शोषण केल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला आहे. तसेच तरुणीकडून लाखो रुपये घेतल्यासह तिची महागडी कार हडपल्याचाही आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. याप्रकरणी अंधेरी एमआयडीसी पोलिसांनी कारवाई केली.

शिवम दुबे उर्फ ‘चोंग्या’ असे अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. तो एमआयडीसी महाकाली परिसरात राहत असून, एका राजकीय पक्षाशी संबंधित असल्याचे सांगण्यात येते. परिसरात तो स्थानिक युवा नेता म्हणूनही ओळखला जात असल्याचा दावा करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, शिवम दुबे याने पीडित तरुणीशी जवळीक वाढवून तिला लग्नाचे आश्वासन दिले. त्यानंतर सुमारे तीन वर्षे तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे.

याच काळात आरोपीने पीडितेचा विश्वास संपादन करून तिच्याकडून लाखो रुपयांची रक्कम घेतल्याचा आरोप आहे. तसेच तिची महागडी कारही स्वतःकडे घेतल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, पीडितेसोबत संबंध असतानाच आरोपी उत्तर प्रदेशात दुसऱ्या मुलीसोबत लग्न करण्याच्या तयारीत असल्याची माहिती तिला मिळाली. यानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने तरुणीने एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

तक्रार मागे घेण्यासाठी आरोपीने राजकीय दबाव आणण्याचा प्रयत्न केल्याचाही आरोप पीडितेने केला आहे. मात्र, दबावाला न जुमानता तिने पोलिसांकडे तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी शिवम दुबे याला अटक केली. अटकेनंतर त्याच्या पूर्वीच्या कारवाईचीही माहिती समोर आली आहे. २०२३ मध्ये त्याच्यावर तडीपारीची कारवाई करण्यात आली होती. मात्र, राजकीय प्रभावाचा वापर करून ही कारवाई रद्द करून घेतल्याचा दावा पीडितेने तक्रारीत केला आहे. या प्रकरणातील आरोपांची सत्यता तपासण्यासाठी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.







