पुणे : वानवडी येथील मॅरीड वसाहत येथे राहणाऱ्या भारतीय सैन्य दलातील जवानाच्या घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून कपाटातुन 215 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व 100 ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने असा ऐवज चौरून नेणाऱ्या चोरट्यास वानवडी पोलिसांनी अटक केली.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, फिर्यादी दनाजयाँ वादिवेल्लू (वय 35 वर्ष )हे भारतीय सैन्य दलात हवालदार असून ते वानवडी येथील मॅरीड वसाधीमध्ये राहतात. 7 मार्च 2025 रोजी फिर्यादी यांचे घर बंद असताना कोणतीरी अज्ञाताने घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. कपाटाचे लॉक तोडून कपाटातील 215 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व 100 ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने चोरून नेले. याप्रकरणी फिर्यादीने वानवडी पोलीस स्टेशन फिर्याद दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी पुढील तपास केला असता वानवडी कंटोमेट, कोंढवा, गोळीबार मैदान, स्वारगेट,मंगळवार पेठ,खडकी बंड गार्डन पुणे स्टेशन विमान नगर इत्यादी ठिकाणचे साधारण 20 km अंतरावरील 120 पेक्षा फुटेज चेक केल्या असता आरोपी निदर्शनास आला. त्यानुसार संशयित आरोपी पुणे स्टेशन जवळील शेठ मोरारजी गोकुळदास सनीटोरियम आणि धर्मशाळा या लॉजवर थांबलेला निष्पन्न झाला. तेथे त्याने सादर केलेल्या आधारकार्ड वरून मोबाईल नंबर मिळाला. या मोबाईल नंबरचे तांत्रिकी विश्लेषण करता आरोपीचे नाव अमरजीत विनोद कुमार शर्मा ( रां. हमीरपुर राज्य हिमाचल प्रदेश )असल्याचं समोर आलं.
दरम्यान संशयित आरोपी बंगलोर येथे असल्याची माहिती पोलीस अमलदार अमोल गायकवाड व विष्णू सुतार यांना मिळाली. त्याद्वारे त्यांनी वरिष्ठांची परवानगी घेऊन तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक धनाजी टोणे,पोलीस अंमलदार अमोल गायकवाड विष्णू सुतार व यतीन भोसले यांसह तात्काळ रवाना झाले. सर्व टीम बंगलोर येथे पोहोचले असता संशयित आरोपीचे लोकेशन हे कोल्हापूरच्या दिशेने जात असल्याच मिळाल्यानंतर आरोपीचा पाठलाग करून त्यास खंडाळा सातारा येथे ताब्यात घेण्यात आलं. त्यानंतर त्याच्याकडून एकूण 23 हजार 600 रुपयेचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्यामध्ये शगबॅग,चार मोबाईल हँडसेट,एक पॅड, पॅन्ट -शर्ट,आर्मीचे कार्ड,आधारकार्ड व स्टीलची कटावणी असा मुद्देमाल मिळाला. त्यानंतर त्याने आपल्या चोरीची कबुली दिली. त्याला अटक करण्यात आली.
दरम्यान आरोपीने चोरी केलेले सोन्याचे दागिने हडपसर येथे करण सत्यप्रकाश डोंगर (वय 28 वर्ष, रां.बीटी कवडे रोड,नवीन ब्रिज जवळ घोरपडी) यास विक्री केल्याचे सांगितलं. त्याचबरोबर आरोपीने भारतीय आर्मीचे ओळखपत्र दाखवून आर्मी ऑफिसर असल्याची खोटी बतावणी करून सोनारांना खोटे सांगून सोने घाण ठेवून पैसे घेतले. अशाप्रकारे अटक आरोपीकडून एकूण 13 लाख 77 हजार रुपये किमतीचा एकूण 162g वजनाचा सोन्याचा मुद्देमाल व इतर साधन जप्त करण्यात आले आहे.
सदरची कारवाई राजकुमार शिंदे,पोलीस उप -आयुक्त परिमंडळ 05 पुणे शहर श्री धन्यकुमार गोडसे, सहाय्यक पोलीस आयुक्त वानवडी विभाग,पुणे शहर व श्री सत्यजित आदमाने,वरिष्ठ पोलीस निरीक्षक व गोविंद जाधव,पोलीस निरीक्षक (गुन्हे )वानवडी पोलीस स्टेशन पुणे शहर यांचे सूचना व मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक धनाजी टोणे, पोलिस अंमलदार दया शेगर, महेश गाढवे, अमोल पिलाने, अतुल गायकवाड,अमोल गायकवाड,विष्णू सुतार, गोपाळ मदने,यतीन भोसले, सोमनाथ कांबळे,अभिजीत चव्हाण, बालाजी वाघमारे या विशेष पथकाने केली आहे..