सागर जगदाळे
भिगवण : काही लोकांची अशी श्रद्धा आहे की चौदा वर्षांचा वनवास संपवून रामचंद्र सीतेसह अयोध्येला परत आले. तो याच दिवसात पण त्यावेळी त्याचे स्वरूप आजच्यापेक्षा खूपच भिन्न होते. प्राचीन काळी हा यक्षांचा उत्सव मानला जायचा. अंधार दूर करून प्रकाश निर्माण करणारा दीप मांगल्याचे प्रतीक मानला जातो. त्याच्या प्रकाशाने आपल्या जीवनातील अंधकार दूर व्हावा म्हणून हा दीपोत्सव साजरा केला जातो.
पावसाळ्यातील समृद्धीच्या, आनंद उत्सवाचा, कृतज्ञतेचा हा सोहळा मानला जातो.आपली दिवाळी हा प्रकाशाचा उत्सव आहे, हा प्रकाशाचा उत्सव साजरा करताना आपण काळोख्या रात्रीला तेजोरत्नांच्या अलंकारांनी सजवतो, नटवितो, शोभायमान करतो.
तक्रारवाडी येथील थडसरी डोंगराच्या माथ्यावर असलेल्या थाडेश्वर मंदिरामध्ये भिगवण सायकल क्लब यांच्यावतीने दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शेकडो दिवे त्या ठिकाणी लावण्यात आले. या दिव्यामुळे थाडेश्वर मंदिर परिसर उजाळून निघाला होता.
दरम्यान, भिगवण सायकल क्लबच्या वतीने नेहमीच सांस्कृतिक व समाजोपयोगी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. दिवाळीनिमित्त महादेवाच्या मंदिर परिसरात दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाला सायकल क्लबचे अध्यक्ष केशव भापकर, खजिनदार राहुल गुंदेचा, प्रवीण वाघ, अल्ताफ शेख नामदेव कुदळे, योगेश चव्हाण, प्रसाद पाटील, हुजेफ शेख, आयन शेख तसेच महिलांमध्ये सुषमा वाघ,परवीन शेख, रेहाना शेख, जस्मिन शेख, तस्लिम शेख,समृद्धी भापकर, पूजा चव्हाण, इकरा शेख, आसमन शेख तसेच लहान मुले मोठ्या संख्येने उपस्थित होते.