पुणे : राज्य सरकारने ऑक्टोबरमधील पावसात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आधीच्या सहाय्यानुसार मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी (ता. २) झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत दिली. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे वेगाने सुरू असून यासंदर्भात प्रशासनाला सूचना दिल्याची माहिती देखील त्यांनी यावेळी दिली.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, आजपर्यंत कधीही सततच्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जात नव्हती. मात्र, आमच्या सरकारने प्रथमच अशा शेतकऱ्यांना वाऱ्यावर न सोडता दिलासा देण्याचा निर्णय घेतला असून यासाठी सुमारे ७५० कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले आहे. ऑक्टोबर महिन्यात झालेला सततचा पाऊस आणि नुकसानीसाठी हेच निर्णय लागू करण्यात येणार आहेत’, असे शिंदे म्हणाले.
प्राथमिक अंदाजानुसार ऑक्टोबरमधील अतिवृष्टीमुळे सुमारे ५ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. त्यापूर्वी झालेल्या सतत पावसाने नुकसानीपोटी सरकारने शेतकऱ्यांना ७५० कोटी रुपये मदतीचे वाटप केले आहे.
दरम्यान जून-जुलै पासून सुरू असलेल्या पावसामुळे नुकसान झालेल्या ४० लाख १५ हजार ८४७ शेतकऱ्यांना सुमारे ४७०० कोटींची मदत करण्यात आली आहे. अशी माहिती मदत व पुनर्वसन विभागाने दिली आहे.