पुणे : राज्यभरात मॉन्सूनचे प्रवाह सध्या मंदावले असल्यामुळे अनेक भागांत पावसाने विश्रांती घेतली आहे. मात्र, आज उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागांत विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. उर्वरित महाराष्ट्रात ढगाळ हवामानासह काही ठिकाणी हलक्या पावसाच्या सरी कोसळू शकतात.

गेल्या 24 तासांमध्ये राज्यातील हवामानात मोठा फरक पाहायला मिळाला. सोलापूर येथे सर्वाधिक 34 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली, तर यवतमाळमध्ये सर्वात कमी 17 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. तसेच, डहाणू परिसरात 30 मिमी पावसाची नोंद झाली आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मॉन्सूनचा मुख्य कमी दाबाचा पट्टा सध्या राजस्थानमधील श्रीगंगानगर, नार्नुल, सिधी, दाल्तोगंज आणि बंकुरावरून ईशान्य भारतातील त्रिपुरापर्यंत पसरला आहे. यासोबतच, हरियाणापासून दक्षिण आसामपर्यंत आणि दक्षिण गुजरातपासून बांगलादेशच्या भागापर्यंत उप-कमी दाबाचे पट्टे सक्रिय आहेत.

‘या’ जिल्ह्यांना पावसाचा इशारा
आज विशेषतः उत्तर महाराष्ट्रातील नाशिक आणि धुळे, तसेच मराठवाड्यातील नांदेड या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जना आणि विजांसह पाऊस होण्याची शक्यता आहे. उर्वरित संपूर्ण राज्यात मात्र ऊन-सावल्यांचा खेळ सुरू राहील आणि ढगाळ वातावरणासह केवळ तुरळक ठिकाणीच हलक्या सरींची नोंद होईल.






