सुरेश घाडगे
परंडा : भूम सरहद्दीवरील ईडा येथील आयान मल्टीट्रेड एल्.एल.पी. संचलित बाणगंगा सहकारी साखर कारखान्याकडे गळीत हंगाम २०२१-२२ करिता गाळपास दिलेल्या ऊसासाठी प्रति मे. टन १५० प्रमाणे दुसरा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला आहे.
गौरी- गणपती सणाचे औचित्य साधून हप्ता काढल्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी सुखावला आहे. पहिला हप्ता २१०० सह एकूण २२५० रूपये शेतकऱ्यांना आदा करण्यात आले आहेत अशी माहिती कारखान्याचे चेअरमन माजी आमदार राहूल मोटे यांनी शुक्रवारी (ता. ०२) दिली. अगामी हंगाम २०२२-२३ साठी तोडणी वाहतुकीचे करार पूर्ण झाले असून गाळप हंगाम सुरू करण्याच्या दृष्टीने कारखाना दुरुस्तीच काम पूर्ण झालेले आहे.
दरम्यान, आगामी हंगाम लवकरच सुरू होणार आहे. ऊस उत्पादक शेतकरी यांनी ऊस गाळपास द्यावा. असे आवाहन बाणगंगा कारखान्याचे चेअरमन व माजी आमदार राहुल मोटे व आयन मल्टीत्रट्रेड एल.एल.पी चे संचालक सचिन सिनगारे यांनी केले आहे. यावेळी जनरल मॅनेजर संतोष तोंडले, मुख्य शेती अधिकारी विठ्ठल मोरे, चीफ इंजिनिअर राजेशकुमार शिंदे, चीफ अकौंटट विशाल सरवदे, स्टोअर किपर नानासाहेब जाधव उपस्थित होते.
दरम्यान, कॅबीनेट मंत्री तानाजी सावंत यांच्या परंडा तालुक्यातील भैरवनाथ शुगर ने पहिला हप्ता २००० काढला आहे. दुसरा हप्ता कधी काढणार? याकडे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. बार्शी तालुक्यातील उपळाई (ठों) येथील इंद्रेश्र्वर शुगर ने तर परंडा तालुक्यातील ऊस दिलेल्या शेतकऱ्यांना गाजरच दाखवलं आहे ! अनेक शेतकऱ्यांना अद्यापही एक रुपया ही दिलेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांतून संताप व्यक्त्त होत आहे. कांही दिवसांपुर्वी शेतकरी कैवारी संघटनांच्या पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी यांनी कारखाना स्थळी कार्यालयाची तोडफोड केली होती . तरीदेखील शेतकऱ्यांना बीलं आदा झालेली नाहीत!