हनुमंत चिकणे
उरुळी कांचन, (पुणे) : येथील संघर्ष प्रतिष्ठानमार्फत घेण्यात आलेल्या “पद्मश्री डॉ. मणिभाई देसाई दिवाळी गड-किल्ले” स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला असून दिवाळीच्या निमित्ताने दरवर्षी घराघरांमध्ये किल्ले प्रतिकृती बांधण्याचा पारंपरिक वारसा टिकून राहावा तसेच किल्ल्यांद्वारे आपल्याला राष्ट्रभक्तीची ओढ कायम राहावी याच उद्देशाने मागिल ८ वर्षापासून या स्पर्धेचे संघर्ष प्रतिष्ठानमार्फत या स्पर्धेचे आयोजन केले जात आहे.
यावर्षी या स्पर्धेत अनेक स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेची लोकप्रियता वाढत असून किल्ला तयार करणारे मुले, मुली, समूह या स्पर्धेत आपला सहभाग नोंदवत आहेत.
या सर्व सहभागी स्पर्धकांना युवा नेते सौरभ जगताप यांच्या वतीने स्मृती चिन्ह देण्यात आले.तसेच विजेत्या स्पर्धकांना “निर्माण डेव्हलपर्स व निखिल कांचन” यांच्या वतीने पारितोषिके देण्यात आली.
इतिहासाचे संवर्धन व जागृती व्हावी यासाठी अनिरुद्ध पवार यांनी मार्गदर्शन केले. स्पर्धेतील प्रथम क्रमांकाचे पारितोषिक “छत्रपती ग्रुप”ला मिळाले. तसेच शिवप्रतिष्ठान, केदार जाधव, साहिल खलसे, आर्यन कांचन, प्रतीक भोंगळे, ओम लोखंडे यांनाही विजेते क्रमांक मिळाले.
यावेळी जिल्हा परिषदेच्या महिला बालकल्याणच्या माजी सभापती योगिनी कांचन, शिवाजी कांचन, युवराज ताटे, अरविंद कांचन, सुनिल तुपे यांच्या शुभहस्ते बक्षिस वितरण करण्यात आले.
कार्यक्रमाची प्रस्तावना संदीप कांचन यांनी केली तर आभार शारिक सय्यद यांनी मानले.