हनुमंत चिकणे
उरुळी कांचन (पुणे) : “बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले” या वाक्यानुसार उरुळी कांचन (ता. हवेली) येथील माजी उपसभापती हेमलता बडेकर यांनी उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीतील गोळे वस्ती परिसरातील नागरिकांसाठी वाढदिवसाचा अनाठायी खर्च टाळून स्मशानभूमी बांधली आहे. त्यांच्या या कार्याचे उरुळी कांचनसह परिसरात कौतुक होत आहे.
हेमलता बडेकर यांचे स्वर्गीय पती उरुळी कांचनचे माजी सरपंच बाळासाहेब बडेकर हे सरपंच असताना गोळे वस्ती येथील नागरिकांसाठी स्वतंत्र स्मशानभूमी बांधून देऊ असे आश्वासन त्यांनी येथील नागरिकांना दिले होते. परंतु बाळासाहेब बडेकर यांचे अचानक आकस्मिक निधन झाले. त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी हेमलता बडेकर यांनी पतीने दिलेल्या आश्वासनाची पूर्ती केली आहे. त्यानुसार हेमलता बडेकर यांच्या वाढदिवसानिमित बुधवारी (ता. ०२) या समशानभूमीचे लोकार्पण करण्यात आले.
उरुळी कांचनचे माजी सरपंच स्व. बाळासाहेब बडेकर यांच्या स्मरणार्थ गोळे वस्ती परिसरात बांधलेल्या स्मशानभूमीचे उद्घाटन उरुळी कांचनचे सरपंच राजेंद्र कांचन, माजी उपसभापती हेमलता बडेकर, माजी उपसरपंच जितेंद्र बडेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी हवेली तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस ओ.बी.सी. सेलचे अध्यक्ष सुभाष टिळेकर, उरुळी कांचनचे ग्रामपंचायत सदस्य अमित बाबा कांचन, सुनील तांबे, भाऊसाहेब तुपे, अॅड. विजेंद्र बडेकर, रील्स स्टार मोनू बडेकर, सुभाष बगाडे, नंदू मोहिते, किरण कसबे, आबासाहेब चव्हाण यांच्यासह गोळे वस्तीवरील नागरिक उपस्थित होते.