पुणे : राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस आहे. या अधिवेशन काळात अनेक मुद्दे चर्चेत आले त्यामुळे हे अधिवेशन गाजले.मात्र आज शेवटच्या दिवशीही विरोधक आक्रमक होणार असून विविध मुद्द्यावरून अधिवेशन गाजणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. आज अधिवेशन संपल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांची पत्रकार परिषद होणार आहे.या पत्रकार परिषदेत ते काय बोलतात याकडेही सर्वांचे लक्ष लागून राहिल आहे.
आतापर्यंत अधिवेशनात झालेल्या घोषणा
1. एकेकाळी नक्षलग्रस्त म्हणून ओळखला जाणारा गडचिरोली जिल्हा आता ‘स्टील हब’ म्हणून उदयास येत असल्याची घोषणा
2. मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा-1 ची कामे पूर्णत्वास आली असून टप्पा-2 अंतर्गत 9 हजार 610 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांच्या दर्जोन्नतीची कामे मार्च, 2026 अखेर पूर्ण करण्याचं नियोजन.
3. सर्वांसाठी घरे’ हे उद्दिष्ट येत्या पाच वर्षात साध्य करण्यासाठी राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण लवकरच जाहीर करण्यात येणार.
4. कृषि क्षेत्रामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराचे धोरण आखण्यात येणार
5. जलयुक्त शिवार अभियान 2.0 अंतर्गत 5 हजार 818 गावांमध्ये 4 हजार 227 कोटी रुपये किंमतीची 1 लाख 48 हजार 888 कामे हाती. अभियानातील सर्व कामे मार्च, 2026 पर्यंत पूर्ण करण्यात येणार
अर्थसंकल्पीय अधिवेशनात कोणत्या घोषणा झाल्या नाहीत?
1. विधानसभा निवडणुकीनंतर सत्तेत आल्यावर 1500 रुपये ऐवजी 2100 रुपये लाडक्या बहिणीना देण्याचं आश्वासन करणाऱ्या सरकारने या अर्थसंकल्पात या संदर्भात घोषणा केली नाही
2. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा निवडणूक काळात दिलेली होती. मात्र या अर्थसंकल्पात ही घोषणा होऊ शकली नाही.
3. प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांना (लाडका भाऊ) ही 11 महिन्यांच्या पुढे भत्ता मिळणार नसल्याचा निर्णय घेण्यात आला
4. निवडणुकीच्या आधी केलेल्या मोठया घोषणांसाठी वेगळ्या निधीची तरतुद अर्थसंकल्पात पाहायला मिळाली नाही.
या अधिवेशनाच्या आजच्या शेवटच्या दिवशी विविध मुद्द्यावरून विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरणार असून आजचा अधिवेशनाचा शेवटचा दिवस वादळी ठरणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.