पुणे : तानाजी मालुसरे यांच्या पराक्रमाची साक्ष देणारा उमरठ (जि.रायगड) येथील ऐतिहासिक ‘वृक्ष’ सोमवारी (ता.११) कोसळला आहे. हे ऐतिहासिक वृक्ष’ कोसळल्याने शिवप्रेंमी हळहळ व्यक्त करीत आहेत.
तानाजी मालुसरे हे शिवाजी महाराजांच्या सैन्यातील एक सुभेदार व शिवाजी महाराजांचे बालपणीचे सवंगडी होते. तानाजी मालुसरेंनी महाराष्ट्रात शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेपासूनच अनेक महत्त्वाच्या घडामोडीत सहभाग घेतला होता.
रायगड जिल्ह्यातील सोमवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे हे झाड मुळापासून उन्मळून पडले आहे. पावसामुळे कोसळलेले हे आंब्याचे झाड हटविण्याचे काम नरवीर रेस्क्यू टीमने केले आहे.
दरम्यान, नरवीर तान्हाजी मालुसरे यांच्या स्मारकात एक आंब्याचे झाड होते. हे साडे तीनशे वर्ष जुने झाड होते. तानाजी मालुसरे यांच्या पराक्रमाचा साक्षीदार म्हणून हे आंब्याचे झाडे ओळखले जात होते. तानाजी मालुसरे यांनी स्वत: हे झाड लावले होते, असे सांगितले जात आहे. काही वर्षांपूर्वी आंब्याची डहाळी तुटली असता त्यातून तलवारी पडल्या, असे सांगितले जात आहे. त्यातील दोन तलवारी येथे असून बाकीच्या तलवारी पुणे येथे नेल्या आहेत.