करमाळा : करमाळा शहरालगतची महत्त्वाची ग्रामपंचायत असलेल्या देवळाली ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी पोपट बोराडे यांची 7 विरुद्ध 4 मताने निवड झाली असून या ग्रामपंचायतीवर माजी आमदार संजयमामा शिंदे गटाचा झेंडा फडकला आहे. पोपट बोराडे हे देवळालीचे माजी सरपंच आशिष गायकवाड यांचे समर्थक आहेत. या ग्रामपंचायतीची सदस्य संख्या 13 असून राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या पदासाठी काल निवड प्रक्रिया गुप्त मतदान पद्धतीने घेण्यात आली यामध्ये 11 सदस्यांनी सहभाग नोंदवला.त्यामध्ये 7 मते मिळाल्याने पोपट बोराडे यांची सरपंचपदी निवड झाली आहे.
देवळाली ही बहुचर्चित ग्रामपंचायत आहे.ही ग्रामपंचायत करमाळा तालुक्याच्या राजकारणाची दिशा ठरवते अशी त्याच्या पाठीमागे पार्श्वभूमी आहे.या ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आशिष गायकवाड यांचे काही दिवसापूर्वी सदस्यत्व रद्द करण्यात आले होते, परंतु आयुक्त यांच्याकडे झालेल्या सुनावणीनंतर त्यांच्या आदेशाने त्यांचे सदस्यत्व शाबित राहिलेले आहे. अशा या ग्रामपंचायतीवरती माजी आमदार संजय मामा शिंदे यांचा झेंडा फडकल्यामुळे सरपंच पोपट बोराडे व माजी सरपंच आशिष गायकवाड यांच्यावरती अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.