लोणी काळभोर, ता.07 : तहसीलदारांच्या आदेशाला न जुमानता दौंड तालुक्यातील मंडल अधिकाऱ्याचा येडा गबाळा कारभार समोर आला आहे. फेरफारवरील तक्रारी केसेसमधील मंडल अधिकाऱ्याच्या अनियमिततेमुळे अर्धन्यायीक न्यायाधीकरणावरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. प्रोटोकॉलच्या सर्वोच्च आकडेवारीवर मंडलाधिकाऱ्याचा कारभार हेलकावे खात असल्याने नागरिकांना काय न्याय मिळणार? याबाबत नागरिक उघडपणे बोलायला लागले आहेत. त्यामुळे दौंड मंडल अधिकारी कार्यालयाचा महसूली कारभार “कानाने बहिरा अन् डोळ्याने आंधळा” वाटू लागला आहे.
दौंड तालुक्यातील मौजे नानवीज येथील गट नंबर २१३/१ मधील फेरफार क्रमांक २६७६ बाबत तक्रारदाराने तक्रार केलेली आहे. यामुळे मंडल अधिकारी भानुदास येडे यांच्याकडे तक्रार केस नोंद/ एस आर/०७/२०२३ अन्वये दाखल आहे. परंतु, यामध्ये वरिष्ठ कार्यालयातील तहसीलदार यांच्या लेखी आदेशालाच केराची टोपली दाखवण्याची किमया मंडल अधिकारी येडे यांनी साधली आहे.
प्रस्तुतची केस तहसील कार्यालयाकडे वर्ग करण्याबाबत तहसीलदारांनी लेखी आदेश दिलेला असतानाही, त्याकडे दुर्लक्ष करत संबधित मंडल अधिकाऱ्याने सुनावणी घेत निकाल पारित केलेला आहे. त्यामुळे तहसीलदारांच्या आदेशाची मंडल अधिकारी कशा प्रकारे अमंलबजावणी करतात, याची प्रचिती दौंडमध्ये येत आहे. वरिष्ठ कार्यालयातील लेखी आदेशाकडे दुर्लक्ष केल्यास, कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी कारवाई होऊ शकते, हा सर्वसाधारण नियम आहे. परंतु, हे ज्ञात असतानाही प्रोटोकॉलच्या पाठबळावर वरिष्ठांच्या आदेशालाच दौंड सर्कलने उघडपणे हरताळ फासल्याचा प्रकार समोर आला आहे.
बदली प्रक्रियेत लाखो रुपयांचा मलिदा, मंडल अधिकाऱ्यांना कारवाईची भिती नाही
पुणे जिल्ह्यातील हवेली, दौंड, मुळशी, खेड यांसारख्या तालुक्यात मंडल अधिकारी ही क्रीम पोस्ट म्हणून ओळखली जाते. त्यामुळे तेथील पदभार मिळवण्यासाठी वेगळ्याच प्रोटोकॉलच्या आकड्यांची स्पर्धा असते. यामध्ये सर्वोच्च बोलीसोबत राजकीय शिफारशीला अनन्यसाधारण महत्व असल्याने, वरिष्ठ कार्यालयात आकड्यांचा मोठा बोलबाला असतो. लाखमोलाचा प्रोटोकॉल देऊन मंडल अधिकारी पोस्ट घेत असतात.
त्यानतंर त्या पोस्टमधून महसूली वसुली करत क्रीम काढत असतात. मात्र यासाठी बहुतांश सर्कल नियमबाह्य कामे करुन आपली वसुली करतात. वरिष्ठ कार्यालयात गोपनीयरित्या प्रोटोकॉल देऊन पदभार घेतल्याने, चुकीची, नियमात न बसणारी कामे केली तरीही वरिष्ठांकडून कारवाईची शक्यता कमीच असते. त्यामुळेच हे सर्कल वरिष्ठ कार्यालयातील आदेशाला केराची टोपली दाखवत असल्याचा धक्कादायक प्रकार अनेकदा समोर आला आहे.
प्रोटोकॉलच्या जिवावर काही सर्कल अनेक वर्ष सधन तालुक्यात ठाण मांडून
हवेली, दौंड, मुळशी व खेड या तालुक्यातील ठराविक सर्कल वर्षानुवर्षे गुळाच्या ढेपेला मुंगळा ढसल्याप्रमाणे तालुक्याला चिकटले आहेत. यामध्ये अनेकांची प्रशासनाकडून खातेनिहाय चौकशी सुरू आहे, तर काहींच्या मागे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या केसेस सुरू आहेत. तरी देखील ते सर्कल तालुक्याला प्रोटोकॉलच्या जिवावर चिकटून बसल्याने त्यांची दुसऱ्या तालुक्यात बदली होत नाही, हे विशेष आहे.
जिल्हा प्रशासनाच्या प्रोटोकॉलच्या महसूली नियमांमुळे वरील तालुक्यात खातेनिहाय चौकशी सुरू असलेले सर्कलच ‘अ’ व ‘ब’ वर्गांच्या क्रीम पोस्टचा पदभार मिळवत आहेत. त्यामुळे इतर मंडल अधिकाऱ्यांवर अन्याय होत असून त्यांना ‘क’ व ‘ड’ वर्गांच्या पोस्टचा पदभार स्विकारावा लागत आहे. मात्र, वरिष्ठ कार्यालयाच्या सिस्टिम विरोधात कोणीही तोंड उघडायला तयार नसल्याने चौकशीचा ससेमिरा सुरु असलेले मंडलाधिकारी तालुक्याला गुळाच्या ढेपेप्रमाणे चिकटून महसूली कार्यविवरण साधत आहेत.
दरम्यान, याबाबत दौंड मंडल अधिकारी भानुदास येडे यांच्याशी फोनद्वारे संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही.
जाब देणार स्थानिक असल्यामुळे दबाव येऊन न्याय प्रक्रियेत मंडल अधिकारी यांच्याशी संगनमत होऊन, गुण दोषांवर न्याय मिळण्याची शक्यता कमी वाटत असल्याने संबंधित तक्रार केस तहसील कार्यालयात वर्ग करण्याची लेखी अर्जाद्वारे मागणी केली होती. याबाबत तहसीलदारांनी प्रस्तुतची केस तहसील कार्यालयात वर्ग करण्यात यावी, यासाठी लेखी आदेश दिलेला आहे. तरीही सर्कलच्या मनमानी कारभारामुळे तक्रार केस वर्ग झाली नाही. दौंड मंडल अधिकारी भानुदास येडे यांच्या तक्रारी केसेसच्या कामकाजातील अनियमिततेची तक्रार विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.
– रमेश भोसले, तक्रारदार शेतकरी
संबंधित प्रकार काय आहे, हा मला पाठवा. तो मी पाहून सोमवारी त्याबाबत पुढील कारवाईचा निर्णय घेण्यात येईल.
– अरुण शेलार, तहसीलदार, दौंड