सुरेश घाडगे
परंडा – परंडा शहारा लगतच्या शेतात मोकाट जनावरे घुसून पिंकांची नासधूस वारंवार करत असल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. शहरात मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी परंडा तहसिलदार व मुख्याधिकारी यांच्याकडे अनेक वेळा करूनही जनावरे मोकाटच आहेत. पालिकेने दुर्लक्ष केल्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.
नगर परिषदेने काढलेला कोंडावडा औटघटकेचा ठरला असून त्यामुळे मोकाट जनावरांच्या मालकांची दहशत तर जनावरांची वर्दळ कायम आहे. मोकाट जनावरांचा सुळसुळाट वाढला आहे . शेतातील पीकांची नासाडी करून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान मोकाट जनावरे करीत आहेत. तसेच बाजारपेठ, रोड, चौक, बसस्थानक आदि ठिकाणी यांचा वावर असल्याने नागरिकांना तसेच व्यापारी, भाजी, फळे विक्रते यांना त्रास सहन करावा लागत आहे . या जनावरांनी नागरिकांना धडक देणे, चेंगरने व तुडवल्याच्या अनेक घटना घडलेल्या आहेत.
नागरिकांच्या जिवितास धोका निर्माण झाला आहे . शेतकऱ्यांना रात्रंदिवस राखण करावी लागत आहे . मोकाट जनावरे शेतकऱ्यांनी पकडून बांधून ठेवली तर हे लोक दमदाटी करून सोडवून नेतात . नगर परिषदेच्या दुर्लक्षीत कारभारामुळे यांची मुजोरी व मनगटशाही वाढली आहे.
दरम्यान, मोकाट जनावरे,डुकरं- कुञी यांचा सुळसुळाट झाला आहे.त्यामुळे दुर्गंधी ,अस्वच्छता पसरून घाणीचे साम्राज्य शहरात निर्माण झाले असून परिसरातील नागरीकांचे अरोग्य धोक्यात आले आहे.स्वछतेचे धडे शिकविणार्या शासन प्रशासनाने या परिसरात स्वछता राबवावी,आशी मागणी होत आहे.