मुंबई : मुंबईमधील हवेच्या गुणवत्तेचा स्तर दिवसेंदिवस ढासळत आहे. हवेच्या गुणवत्तेचा स्तर वाढावा यासाठी महानगरपालिकेने विविध उपाययोजना हाती घेतल्या आहेत. आता महानगरपालिकेने ‘संपूर्ण स्वच्छता’ मोहीम हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत रविवार, ३ डिसेंबर रोजी सकाळी ७ वाजता धारावी येथून या मोहिलेला सुरुवात करण्यात येणार आहे. तसेच याच दिवशी महानगरपालिकेच्या ‘डी’ विभाग कार्यालयाच्या हद्दीतही ही मोहीम राबविण्यात येणार आहे.
मोहिमेअंतर्गत उपाययोजना
या विशेष मोहिमेअंतर्गत रस्ते धूळमुक्त करण्याबरोबरच बेवारस वाहनांची विल्हेवाट, विनापरवाना जाहिरात फलकांवर कारवाई, सार्वजनिक प्रसाधनगृहांची स्वच्छता, उद्यान – क्रीडांगणांची निगा, निर्मळ कर्मचारी वसाहत, फेरीवाला विरहीत क्षेत्र, राडारोडामुक्त परिसर आदी कार्यवाही केली जाणार आहे. या स्वच्छता मोहिमेत अशासकीय संस्था-संघटना, शालेय विद्यार्थी, महाविद्यालयीन तरूण, ज्येष्ठ नागरिक, खेळाडू, उद्योजक, समाजातील ख्यातनाम व्यक्ती आदींना सहभागी करण्यात येणार आहे. तसेच या मोहिमेत सहभागी होण्यासाठी महानगरपालिकेने लोकप्रतिनिधीनाही साद घातली आहे.
मुंबईला धुळीपासून मुक्ती देण्यासाठी रस्ते, पदपथ, सार्वजनिक ठिकाणे पाण्याने धुण्यात येत आहेत. आता ‘संपूर्ण स्वच्छता’ मोहीम राबविण्याचा धोरणात्मक निर्णय महानगरपालिकेचे आयुक्त इक्लाब सिंह चहल यांनी घेतला आहे. यासंदर्भात महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत या मोहिमेची रूपरेषा ठरविण्यात आली. उपायुक्त (घनकचरा व्यवस्थापन) चंदा जाधव, उपायुक्त (परिमंडळ – १) संगीता हसनाळे, उपायुक्त (परिमंडळ – २) रमाकांत बिरादार यांच्यासह सहायक आयुक्त, घनकचरा व्यवस्थापन विभागातील वरिष्ठ अधिकारी – अभियंता या बैठकीस उपस्थित होते.या मोहिमेमध्ये वाहतूक विभाग, मलनिस्सारण विभाग, पर्जन्य जलवाहिन्या विभाग, अतिक्रमण निर्मूलन विभाग सहभागी होणार आहे. तसेच यासाठी वाहतूक पोलिसांची मदत घेण्यात येणार आहे.