लहू चव्हाण
पाचगणी : पर्यटन नगरी पाचगणी येथील प्रसिध्द बांधकाम व्यावसायिक आर्किटेक्ट इंजिनिअर प्रशांत मोरे यांना बांधकाम क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल मानाचा भास्कर भुषण पुरस्कार गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
महाराष्ट्र जर्नालिझम फाऊंडेशनचा ११ वा गौरव समारंभ गोवा येथील रवींद्र भवन नाट्यगृहात आयोजित करण्यात आला होता.
यावेळी प्रमुख पाहुणे गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, कार्यक्रमाचे अध्यक्ष पद्मश्री विनायक खेडेकर, पर्यटनमंत्री श्रीपाद नाईक, प्रतापसिंह राणे, रमाकांत खलप, दिंगबर कामत, डॉ चंद्रकांत शेट्टी, जर्नालिझम फाऊंडेशनचे अध्यक्ष राजू लोहार आदी मान्यवर उपस्थित होते.
गेली १९ वर्षे स्थापत्य अभियंता म्हणून कार्यरत असलेले बांधकाम व्यावसायिक प्रशांत मोरे यांनी निसर्ग भूमी पाचगणीचा पर्यावरणपूरक वारसा बांधकाम क्षेत्रातही जपला आहे.
बांधकाम क्षेत्रातील विश्वसनीय आणि अग्रगण्य ब्रँड असलेले प्रशांत मोरे यांनी पाचगणी व परिसरात गेल्या काही वर्षांत घराबद्दलच्या ग्राहकांच्या अपेक्षा आणि गरजा जाणून समाधानी ग्राहकांच्या पसंतीला उतरताना सातत्याने भर दिला आहे.
त्यामुळे अनेक संस्था, संघटना यांनी विशेष पुरस्कार देऊन त्यांना गौरविले आहे. मोरे यांना मिळालेल्या भास्कर भुषण पुरस्कारामुळे त्यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
वाई-खंडाळा-महाबळेश्वर मतदार संघाचे आमदार मकरंद पाटील, जिल्हा बँकेचे संचालक राजेंद्रशेठ राजपुरे, माजी नगराध्यक्ष शेखर कासुर्डे,परविन मेमन, माजी उपनगराध्यक्ष नरेंद्र बिरामणे, समन्वय समितीचे माजी अध्यक्ष प्रवीण भिलारे, शिवसेना युवासेनेचे तालुका प्रमुख नितीन भिलारे, माजी तालुकाप्रमुख अजित कासुर्डे, प्रितम कळसकर, दिपक बेलोशे, अमोल माने आदींसह राजकीय सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी प्रशांत मोरे यांचे प्रत्यक्ष भेटून व भ्रमणध्वनीवरून अभिनंदन केले आहे.