लहू चव्हाण
पाचगणी : पर्यटन नगरी पाचगणी शहरात आज सकाळी (२१ जानेवारी) अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ ट्रस्टच्या श्री स्वामी समर्थ पालखीचे भक्तीमय वातावरणात मोठ्या उत्साहात आगमन झाले.
एसटी स्टॅन्ड समोरील जॅम शॉपी येथे सकाळी १० वाजता स्वामी भक्तांच्या उपस्थितीत स्वामी पादुकांचा अभिषेक करण्यात आला. त्यानंतर ढोलताशा टाळमृदुगाच्या गजरात स्वामी नामाच्या जयघोषात गावठाण व बाजपेठेतून सवाद्य पालखी मिरवणूक काढण्यात आली.
बॅंक ऑफ महाराष्ट्रच्या पाठीमागे असलेल्या शांत काॅटेज येथे मोठ्या उत्साहात पालखी व पादुकांचे आगमन झाल्यानंतर स्वामी भक्तांच्या उपस्थितीत अभिषेक करुन आरती करण्यात आली.
यावेळी पादुका दर्शन सोहळा, महाप्रसाद, स्थानिक मंडळाची सुस्वर भजने असा कार्यक्रम संपन्न झाला. या पालखी सोहळ्यासाठी शहर व परिसरातील स्वामी भक्तांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.
महिला लहान मुलासह ज्येष्ठांनी या सोहळ्यात सहभाग घेतल्याने यात्रेचे स्वरूप आले होते. तर संपूर्ण परिसर स्वामी समर्थांच्या जयघोषात दुमदुमला होता. हा पालखी सोहळा यशस्वी करण्यासाठी शहर परिसरातील स्वामी भक्तांनी परिश्रम घेतले.
श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पालखी व पादुकांचे दर्शन आणि सेवा संपूर्ण महाराष्ट्रातील स्वामीभक्तांना करता यावी, यासाठी स्वामींचे मूळ स्थान असलेल्या श्री क्षेत्र अक्कलकोट येथून परिक्रमा करत निघालेल्या पालखीचे २६ वे वर्षे आहे. सुमारे १८३ दिवसांमध्ये महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा राज्यातून १० हजार किलोमीटरचा प्रवास करत ही परिक्रमा ८ मे २०२३ रोजी तीर्थक्षेत्र अक्कलकोट नगरीत विसावणार आहे.