Telangana Election Result 2023 : हैदराबाद ( तेलंगणा ) : केंद्रीय निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळानुसार तेलंगणात काँग्रेस ६६, बीआरएस ३७ आणि भाजपा ९ जागांवर आघाडीवर आहे. त्यामुळे मतदारांचा कौल स्पष्ट होत आहे. काँग्रेस, भाजपा आणि बीआरएस यांच्यात अटीतटीच्या ठरलेल्या तेलंगणातील विधानसभा लढतीत सध्या काँग्रेस आघाडीवर असल्याचं स्पष्ट दिसत आहे. एवढंच नव्हे तर एआयएमआयएमनेही तीन जागांवर आघाडी घेतली आहे. म्हणजेच, काँग्रेसच्या ‘हाता’ने भारत राष्ट्र समितीची ‘गाडी’ तेलंगणामध्ये रोखली असल्याचं दिसतंय.
काँग्रेसचे उमेदवार कोंडा सुरेखा आणि नैनी राजेंद्री रेड्डी हे दोघेही वारंगल पूर्व आणि पश्चिम मतदारसंघातून आघाडीवर आहेत. तर, तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर गजवेल मतदारसंघातून आघाडीवर आहेत. २०१८ मध्ये मुख्यमंत्री केसीआर सिरिल्ला येथून लढले होते. यंदा या जागेवरून कालवकुंतला तारका रामराव हे आघाडीवर आहेत. तर, आदिलाबाद येथून भाजपाचे पायल शंकर विजयाच्या दिशेने वाटचाल करत असून धनपाल सूर्यनारायण निजामाबाद येथून निवडून येण्याची शक्यता आहे. याकूतपुरा जागेवर एआयएमआयएमचे जाफर हुसेन आघाडीवर आहेत. एकूणच काँग्रेसचे पारडे जड आहे. त्यामुळे हैदराबाद येथील काँग्रेस कार्यालयाबाहेर जल्लोष केला जात आहे. तसंच, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी बाय बाय केसीआर असा नारा दिलाय.
काँग्रेसचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण?
काँग्रेस तेलंगणा प्रदेशाध्यक्ष रेवंत रेड्डी यांच्या नावाची मुख्यमंत्री म्हणून जोरदार चर्चा आहे. त्यांनी काँग्रेसला पुढे आणण्यात महत्त्वाची जबाबदारी पार पाडली. केसीआर यांना आव्हान देण्यासाठी त्यांनी कामरेड्डी या मतदारसंघातून केसीआर यांच्याविरोधात उमेदवारी अर्ज दाखल केला. तसेच आपला पारंपरिक कोडंगल मतदारसंघातून निवडणूक अर्ज दाखल केला. दोन्हीकडे ते आघाडीवर आहेत. काँग्रेसला जर बहुमत मिळाले, तर रेवंत रेड्डी हे मुख्यमंत्रिपदासाठी पहिली पसंती असतील, अशी अटकळ अनेक काँग्रेसच्या नेत्यांनी व्यक्त केली आहे. तसेच काँग्रेस कार्यकर्त्यांनीही रेवंत रेड्डी यांच्या नावाला पसंती दिली आहे.
बीआरएसच्या पिछाडीची कारणं काय
बीआरएस पक्षाच्या आमदारांना त्यांच्याच मतदारंसघात प्रचंड विरोध होतोय. तसच, बीआरएस आणि एआयएमआयएम यांचा भाजपाला छुपा पाठिंबा असल्याचीही खुली चर्चा आहे. तर दुसरीकडे कर्नाटकमध्ये अभूतपूर्व यश मिळाल्यामुळे तेलंगणातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे. काँग्रेस नेत्या रेणुका चौधरीयांनी बीआरएस नेते काँग्रेसच्या संपर्कात आहेत असे म्हटले आहे.