लोणी काळभोर (पुणे): पुर्व हवेलीमधील मुळा-मुठा नदी किनाऱ्यावर असलेल्या एका सधन गावातील माध्यमिक शाळेत एका शिक्षकाने आपल्याच शाळेतील एका पंधरा वर्षीय विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. विनयभंगाची ही घटना एका महिन्यापूर्वीची असुन शाळा व्यवस्थापनाने याबाबत पोलिसात तक्रार करण्याऐवजी संबधित नराधम शिक्षकाला सक्तीच्या रजेवर पाठवले आहे.
दरम्यान या प्रकरणातील धक्कादायक बाब म्हणजे सदर नराधम शिक्षकाने काही वर्षापुर्वी हवेली तालुक्याच्या लगतच्या एका तालुक्यातील माध्यमिक शाळेतही अशाच प्रकारे एका पंधरा वर्षीय विध्यार्थ्यानीचा विनंयभंग केला होता. त्यावेळेस ही शाळा व्यवस्थापनाने त्या घटनेबाबत पोलिसात तक्रार करण्याऐवजी संबंधित शिक्षकाला शिक्षा म्हणुन, त्याची बदली पुर्व हवेलीमधील एका शाळेत केली होती. मात्र, या शाळेतसुद्धा वरील शिक्षकाने हे कृत्य केल्याने दोन्ही शाळांचे व्यवस्थापन व शाळेशी संबंधित शिक्षण संस्थेबाबत संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. एक शिक्षक दोन वेगवेगळ्या शाळेतील मुलींचा विनंयभंग करत असताना, या नराधाम शिक्षकांच्या विरोधात गुन्हा दाखल होत नसल्याने पालकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले् आहे.
गोपनीय सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पुर्व हवेलीमधील मुळा-मुठा नदी किनाऱ्यावर असलेल्या एका सधन गावात लगतच्या तालुक्यातील एका शिक्षण संस्थेची पाचवी ते दहावी अशी माध्यमिक शाळा आहे. याच शाळेत दहावीच्या वर्गाला शिकवणाऱ्या एका शिक्षकाने दिवीळीच्या सुट्टीपुर्वी वर्गात एका विषयाचा तास सुरु असताना एका पंधरा वर्षीय मुलीचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला होता. संबधित मुलीला शिक्षक करत असलेले चाळे खटकले. त्यानंतर मुलीने शाळेत घडलेली घटना आपल्या पालकांच्या कानावर घातली. यावर पालकांनी तात्काळ मुख्याधापकांची भेट घेऊन, आपल्या मुलीबाबत घडलेली घटना सांगितली. त्यानंतर मुख्याधापक व शाळा व्यवस्थापन यांनी वरील बाब पोलिसांना न कळवता परस्पर चर्चा करुन प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला. मात्र, सदर शिक्षकाच्या वर्तवणुकीबाबत व घडलेल्या घटनेबाबत पालकांमध्ये वाढत चाललेला असंतोष पाहून सदर शिक्षकाला सक्तीच्या रजेवर पाठवत असल्याचेही शाळा व्यवस्थापनाने जाहीर केले. त्याचवेळी शाळेची बदनामी होऊ नये, यासाठी मुलीच्या पालकांना त्यांना शांत राहण्याची विनंती केली.
या शिक्षकाचा दुसरा गुन्हा, कठोर कारवाईची मागणी
गोपनीय सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पुर्व हवेलीमधील मुळा-मुठा नदीकिनाऱ्यावर असलेल्या वरील सधन गावातील माध्यमिक शाळेच्या संस्थेची आणखी एक शाळा हवेली तालुक्याच्या लगतच्या एका तालुक्यात आहे. त्या शाळेतही वरील नराधम शिक्षकाने एका दहावीतील मुलीचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला होता. त्याही वेळेस शाळा व्यवस्थापनाने शिक्षकाच्या काळ्या कृत्याबाबत पोलिसात तक्रार करण्याऐवजी त्याला काही दिवस सक्तीच्या रजेवर पाठवले होते. हा विषय थंड होताच, त्याची बदली हवेलीमधील एका शाळेत केली होती. या शाळेतही त्याने त्याचे चाळे सुरु ठेवल्याने संबधित शाळेत शिक्षण घेणाऱ्या मुलींच्या सुरक्षततेचा प्रश्न उभा राहिलेला आहे. एकच शिक्षक दोन वेगवेगळ्या शाळेत मुलींचा विनयभंग करत असताना त्याच्यावर कारवाई करण्याऐवजी शाळा व्यवस्थापन पाठीशी घालते, ही बाब अतिशय गंभीर व दुर्देवी आहे.
याबाबत शाळेच्या मुख्याध्यापकांशी ‘पुणे प्राईम न्यूज’च्या प्रतिनीधीने संपर्क साधला असता संबंधित शाळेचे मुख्याध्यापक म्हणाले, घडलेली घटना खरी आहे. मुलीच्या तक्रारीवरुन सदर शिक्षकाला सक्तीच्या रजेवर पाठविले आहे. याबाबत शाळेच्या पातळीवर चौकशी सुरु असुन, या चौकशीत हा शिक्षक दोषी आढळल्यास पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. दरम्यान, या प्रकरणी पोलिसात तक्रार का केली नाही? याबाबत विचारणा केली असता, त्यांनी काहीही बोलण्यास नकार दिला.
या नराधाम शिक्षकावर गुन्हा दाखल करण्यासाठी शाळा चालढकल का करतेय? कारवाई करू नये म्हणून शाळेवर कोणाचा दबाव आहे? शाळा पालकांना शांत राहण्यास का सांगत आहे? जर अशा शिक्षकांवर कारवाई होणार नसेल तर शाळेत मुली सुरक्षित राहणार? असे अनेक प्रश्न सदर शाळेतील मुलींचे पालक उपस्थित करत आहेत.