पुणे : पुण्यामध्ये पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला जिवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका पतीला न्यायालयाने 7 वर्षे सक्तमजुरी आणि 70 हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश अनिरुद्ध गांधी यांनी हा महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे . सोमनाथ साधू सपकाळ (वय 45) असे शिक्षा झालेल्या आरोपी पतीचे नाव असून, याप्रकरणी 2023 मध्ये उत्तमनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

ऑक्टोबर 2023 मध्ये पीडित पत्नीच्या पोटात तीव्र वेदना सुरू झाल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. शौचावाटे ब्लेडचे तुकडे बाहेर पडल्यानंतर 8 नोव्हेंबर रोजी तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय तपासणीदरम्यान तिच्या पोटात ब्लेडचा तुकडा असल्याचे स्पष्ट झाले. पतीनेच कॅल्शियमच्या गोळ्या असल्याचे भासवत कॅप्सूलमध्ये ब्लेडचे तुकडे भरून तिला खायला दिल्याचे तपासात निष्पन्न झाले, त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली होती.
खटल्याच्या सुनावणीदरम्यान पत्नीने न्यायालयात पतीविरोधातील सर्व आरोप फेटाळले आणि त्यांच्यातील वाद मिटल्याचे सांगितले. ती फितूर झाली असली तरी, सरकारी वकील ॲड. पाठक यांनी युक्तिवाद करताना सांगितले की, डॉक्टरांच्या साक्षनुसार हा ब्लेडचा तुकडा प्राणघातक होता आणि त्यामुळे महिलेचा जीव जाऊ शकला असता. आरोपीच्या दबावामुळेच तिने साक्ष बदलल्याची दाट शक्यता आहे. केवळ साक्षीदार फितूर झाल्यामुळे संपूर्ण साक्ष नाकारता येत नाही, असे न्यायालयानेही नमूद केले.

महिला सध्या आरोपीवरच अवलंबून असल्याने आणि त्याच्याकडेच राहत असल्याने, न्यायालयाने आजन्म कारावासाऐवजी त्याला 7 वर्षे सक्तमजुरी व 70 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. वैद्यकीय पुरावे आणि साक्षीदारांच्या जबाबांच्या आधारावर हा निकाल देण्यात आला आहे.







