पुणे : पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेच्या 24 व्या हप्त्याबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. या दिवाळीपूर्वीच, म्हणजेच 30 ऑक्टोबर रोजी पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 2000 रुपये थेट जमा केले जाणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या निधीचे वितरण होणार असून, राज्यातील जवळपास 89.48 लाख शेतकऱ्यांना 1796 कोटी रुपयांचा लाभ मिळणार आहे. यापूर्वी 20 जून 2026 रोजी 23 वा हप्ता जमा करण्यात आला होता.

या योजनेचा 2000 रुपयांचा लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी खालील प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक आहे.बँक खात्याशी आधार कार्ड लिंक असणे, ई-केवायसी (e-KYC) प्रमाणिकरण पूर्ण करणे, भूमी अभिलेख नोंदणी अद्ययावत असणे आवश्यक आहे.
पीएम किसान योजनेच्या लाभासाठी आता ई-केवायसीसोबतच ॲग्रीस्टॅक प्रणालीवर नोंदणी करणे आवश्यक आहे. या प्रणालीद्वारे प्रत्येक शेतकऱ्याला एक युनिक फार्मर आयडी मिळतो, ज्यामुळे शेतीविषयक योजना, अनुदान आणि पीक विम्याचा थेट लाभ मिळणे सुलभ होते.

ॲग्रीस्टॅक नोंदणीसाठी लागणारी कागदपत्रे:

मोबाईल नंबरशी लिंक असलेले आधार कार्ड
जमिनीचा ७/१२ आणि ८-अ उतारा
बँक पासबुक
ज्या शेतकऱ्यांची ई-केवायसी अपूर्ण आहे, जमिनीचा पडताळा झालेला नाही किंवा आधार आणि बँक खात्यातील नावात चुका आहेत, त्यांना हा हप्ता मिळण्यात अडचण येऊ शकते. त्यामुळे उर्वरित दिवसांत या त्रुटी त्वरित दुरुस्त करून घेणे गरजेचे आहे. केंद्र सरकारकडून दरवर्षी तीन हप्त्यांमध्ये एकूण 6000 रुपयांची आर्थिक मदत शेतकऱ्यांना दिली जाते.







