Sushma Andhare : पुणे : ललित पाटील प्रकरणात शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी गंभीर आरोप केला. ललित पाटीलचा एन्काऊंटर होऊ शकतो, अशी भिती सुषमा अंधारे यांनी व्यक्त केली आहे. यावेळी सुषमा अंधारे यांनी ससूनचे डीन संजीव ठाकूर यांच्यावरही गंभीर आरोप केले. तसेच सध्या कशावरच विश्वास ठेवण्यासारखी परिस्थिती नाही, असंही सुषमा अंधारे यांनी नमूद केलं.
ललित पाटील प्रकरणाचा पाठपुरावा : गेल्या दीड महिन्यापासून आम्ही ललित पाटील प्रकरणाचा पाठपुरावा करत आहोत. यात राज्याच्या तरुणांना, त्यांच्या भविष्याला वाचवणं हा हेतू आहे. ससूनसारख्या ठिकाणी २ कोटी रुपयांचे ड्रग्ज सापडणे ही अत्यंत चिंताजनक, धक्कादायक आणि गंभीर गोष्ट आहे. त्यामुळे ससूनमधील काही लोकांची चौकशी होणं गरजेचं आहे.”
सगळ्या लोकांची चौकशी : “सर्वात महत्त्वाचे म्हणजे ससूनचे डीन संजीव ठाकूर यांना काय घडलं होतं हे विचारलं पाहिजे. एखादा कैदी रुग्ण रुग्णालयात येत असेल, तर कारागृह अधीक्षक आणि त्यांच्या अखत्यारीतील अधिकाऱ्यांकडून आधीच माहिती येत असेल. ती माहिती डीनकडे आणि तेथून वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे जात असेल. त्यामुळे या सगळ्या लोकांची चौकशी झाली पाहिजे,” असं मत सुषमा अंधारे यांनी व्यक्त केलं.
संजीव ठाकूर यांच्याकडून उपचार : सुषमा अंधारे पुढे म्हणाल्या, “ससूनच्या डीनची चौकशी व्हावी असं आम्ही खूप आधीपासून सांगत होतो. आता तर त्या म्हणण्यावर शिक्कामोर्तब झालं आहे. वार्ड क्रमांक १६ मध्ये ललित पाटीलवर उपचार करणारे डॉक्टर संजीव ठाकूर आहेत.”
ललित पाटीलचा एन्काऊंटर होऊ शकतो : “ललित पाटीलचा एन्काऊंटर होऊ शकतो किंवा संशयास्पद मृत्यू होऊन हा तपास थांबवला जाईल. सध्या कशावरच विश्वास ठेवण्यासारखी परिस्थिती नाही. त्यामुळे या प्रकरणात ललित पाटीलच्या जीवाचं रक्षण हेही एक मोठं आव्हान असेल,” अशी भितीही सुषमा अंधारे यांनी व्यक्त केली.