अजित जगताप
सातारा : सत्तावीस वर्षाचा तरुण मुलगा आजाराने पीडित आहे. उपचारासाठी मातेला पदर पसरावा लागला तेव्हा, वडूज ता खटाव येथील मनसे चे संघटक सूरज लोहार याने गाडीचे पाटे बसविण्याचे कष्टकरी काम करून दहा हजार रुपयांची आर्थिक मदत केली. त्या मातेला या माणुसकीच्या मदतीने आशेचा किरण दिसू लागला आहे.
याबाबत माहिती अशी की, वाकेश्वर ता खटाव येथील तरुण योगेश कर्पे हा किडनीच्या आजाराने त्रस्त झाला आहे. सातारा येथे खाजगी दवाखान्यात उपचार घेतल्यानंतर त्याला नाशिक येथील एका धर्मदाय दवाखान्यात दाखल करण्यासाठी त्याची आई छाया कर्पे यांनी पुत्रप्रेमापोटी मदतीसाठी पदर पसरला होता.
सदरचे वृत्त सामाजिक कार्यकर्ते व जेष्ठ पत्रकार धनंजय क्षिरसागर यांनी प्रसिद्ध करून समाज्याच्या दानशूर व्यक्तींनी मदत करावी असे सूचित केले होते. त्याला प्रतिसाद म्हणून वडूज ता खटाव येथील सिद्धनाथ कमान पाटा गॅरेज संचालक व मनसे पदाधिकारी सुरज विलास लोहार यांनी एक आठवडा कष्ट करून दहा हजार रुपये गोळा केले व त्या मातेच्या घरी जाऊन कोणताही गाजावाजा न करता सढळ हस्ते मदत केली. त्यांच्या या कार्याची दखल अनेक मान्यवरांनी घेतली आहे.
दोन किलो गहू, पावेशर साखर, तेलाची पिशवी देऊन कॊरोना काळात अनेकांनी प्रसिद्धी मिळवली होती. काहींनी दिंडोरा पिटला होता. पण, गरिबाला मदत करताना जात, पंत, धर्म याचा विचार न करता सूरज लोहार यांच्या रूपाने माणुसकी धावून आली आहे.
आज नाशिक येथे योगेश कर्पे उपचाराला प्रतिसाद देत आहे. त्यालाच नव्हे तर अनेकांना मदत करण्यासाठी सदैव तत्पर असणाऱ्या अशा माणसासाठी अनेक जण दुवा देत आहेत. ‘सौ सोनार की और एक लोहार की’ या वाक्याची आठवण करून देणाऱ्या या घटनेमुळे जगात आज ही माणुसकी जिवंत आहे. याचा अनुभव माळी समाज्यातील कर्पे कुटूंबानी घेतला आहे.
सुरज लोहार च्या या कार्याबद्दल मनसे अध्यक्ष राज ठाकरे, मनसे जिल्हाप्रमुख युवराज पवार, धैर्यशील पाटील, अमोल कांबळे, चंद्रकांत पवार व जेष्ठ पत्रकार धनंजय क्षिरसागर, अजित जगताप, निलेश कणसे, आकाश यादव, मुन्ना मुल्ला, नितीन राऊत व महात्मा फुले विचार मंच अध्यक्ष ऍड धनंजय फरांदे, रिपाइंचे दत्ता शिंदे, शिवसेनेचे विजयसिंह फडतरे, हणमंतराव घाडगे, मुस्लिम समाजातील दाऊद खान मुल्ला, भाजपचे अनिल माळी आदी मान्यवरांनी कौतुक केले आहे. जास्तीत जास्त आर्थिक मदत व्हावी यासाठी सर्व समाज बांधवांनी प्रयत्न करावेत असे आवाहन करण्यात आले आहे.
यावेळी वाकेश्वर सरपंच सौ ताराबाई राऊत, दिलीप फडतरे, रामराव फडतरे, योगेशची आई श्रीमती छाया प्रल्हाद कर्पे, धनंजय क्षिरसागर आदी मान्यवरांच्या उपस्थितीत सुरज लोहार यांनी रोख रक्कम दहा हजार रुपये सुपूर्द केले.
यापूर्वी ही वडूज ग्रामीण रुग्णालयात कोरोना काळात उपचारासाठी आलेल्या रुग्णांना मोफत चहा व नाश्ता देण्याचे कार्य सूरज लोहार यांनी केले होते. तसेच वडूज नगरीत वृक्षारोपण कार्यक्रमासाठी असेच कष्ट करून निधी दिला होता. स्वतः प्रांताधिकारी शैलेश सूर्यवंशी यांनीही त्यांची दखल घेतली होती.