पुणे : खासदार सुप्रिया सुळे यांनी बारामती – पुणे महामार्गावर हिरकणी आणि लालपरी या गाड्या लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी एसटी महामंडळाकडे केली आहे. या मागणीवर आता एसटी महामंडळ काय उत्तर देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
आपल्या सोशल मीडियाच्या अकाउंटवरून खासदार सुप्रिया सुळे यांनी पोस्ट शेअर केली आहे. यात असे म्हटले आहे की, गेल्या काही महिन्यापासून बारामती -पुणे या महामार्गावर हिरकणी आणि लाल परी या गाड्या सोडल्या जात नाहीत. या ऐवजी फक्त शिवशाही गाड्या सोडल्या जातात.या गाड्यांचे तिकीट दर जास्त आहेत. शिवाय त्यातील बऱ्याच गाड्या नादुरुस्त आहेत. त्यामुळे त्या अनेकदा रस्त्यातच बंद देखील पडतात. यामुळे प्रवाशांना नाहक त्रास होत आहे. एसटी महामंडळाला माझी विनंती आहे की,नागरीकांच्या सेवेसाठी या मार्गावर हिरकणी व लाल परी या गाड्या विना वाहक-विना थांबा या सेवेअंतर्गत पुन्हा सुरू कराव्यात तसेच नादुरुस्त शिवशाही बसेस या मार्गावर सोडल्या जाऊ नये असं त्यांनी म्हटलं आहे. आता यावर एसटी प्रशासन काय निर्णय घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
दरम्यान स्वारगेट बस स्थानक आगारात झालेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर एसटी महामंडळ प्रशासन अलर्ट मोडवर आले. आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी महामंडळाच्या जुन्या बस भंगारात काढण्याचा निर्णय देखील प्रशासनाने घेतला आहे.