सागर जगदाळे
भिगवण : आरोग्य सेवेत काम करणं म्हणजे ‘रात्रंदिन आम्हां समर प्रसंग’ अशीच अवस्था असते. कोणती व्यक्ती कधी किती बिकट अवस्थेत आपल्या समोर येईल हे सांगता येत नाही. बरं हे केवळ डॉक्टरांनाच लागू होतं असं नाही. तर सगळ्याच घटकांना अचानक येणाऱ्या प्रसंगांना सामोरं जाण्याची तयारी ठेवावी लागते. याप्रसंगी कामी येते ती समयसुचकता. कारण, काही वेळेस प्रश्न हा कोणाच्या तरी जीवन मरणाचा असु शकतो. त्यामुळे सहसा आरोग्य सेवेतील कर्मचारी हे नेहमीच काही ना काही प्रसंगावधान दाखवत त्यांच्या समोरील आव्हानांना सामोरं जाताना दिसत असतात.या सर्व घटकांमध्ये अँबुलन्स चालक हेही एखाद्यासाठी तारणहार ठरणारे असते.
याचाच प्रत्यय नुकताच काल रात्री पुणे सोलापूर महामार्गावर मदनवाडी गावच्या हद्दीत नव्याने होत असलेल्या पेट्रोल पंपाच्या समोर गुरुवारी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने अपघात झाला. अपघात झाल्यावर दुचाकीवरील दोनजण गंभीर जखमी होऊन रस्त्याच्या कडेला पडले. आपुलकीची सेवा या नावाने भिगवण व परिसरात प्रामाणिकपणे अँबुलन्सची सेवा देणारे केतन वाघ यांना पोलीस प्रशासनाचा रात्री सव्वा एकच्या दरम्यान फोन येतो.
लागलीच अँबुलन्स घेऊन ते घटनास्थळी पोहचतात.जखमींच्या नातेवाईकांची वाट न बघता लगेच जखमींना घेऊन तक्रारवाडी येथील लाईफलाईन मल्टीस्पेशालिटी दवाखान्यात आणून दाखल करतात. वेळेत मिळालेल्या उपचारांमुळे दोन्ही जखमींचे प्राण वाचतात व त्यांना पुनर्जन्म आपुलकीची सेवा या अँबुलन्सचे चालक केतन वाघ यांच्यामुळे मिळाला. सोबत या तरुणांच्या बॅगमध्ये पाचशे रुपयांचा हजारो रुपये असलेला नोटांचा बंडल मिळाला. तो त्यांनी प्रामाणिकपणे जखमींच्या नातेवाईकांकडे सुपूर्द केला.यावेळी जखमींच्या नातेवाईकांनी जखमींचे प्राण वाचविल्याबद्दल व बॅगेत सापडलेले पैसे परत केल्यामुळे केतन वाघ यांचे आभार मानले.
आपुलकीची सेवा या ॲम्बुलन्सद्वारे भिगवण पासून अकरा किलोमीटरवरील गावातील गर्भवती महिलांना दवाखान्यात दाखल करण्यासाठी मोफत ॲम्बुलन्स ची सेवा देण्यात येते.त्याचबरोबर अडचणीच्या काळात अपघातातील जखमी लोकांना सर्व ती मदत करण्याचा नेहमी आजवर प्रामाणिक प्रयत्न राहिला आहे.