लोणी काळभोर : माऊली… माऊली चा जयघोष… टाळ मृदंगाची साथ, चिमुकल्या वैष्णवांचा अपार उत्साह, पारंपारीक वेषभुषा आणि पालखी सोहळ्यात अभंग, फुगड्या, विविध खेळ यामध्ये निघालेल्या दिंडीत चिमुकले वारकरी तल्लीन झाले होते.
लोणी काळभोर येथील रेनबो इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यानी काढलेली दिंडी पालकांसह परिसरातील नागरिकांनी याची देही याची डोळा अनुभवली. विठोबा-रखुमाई, संत तुकाराम व संत ज्ञानेश्वर महाराजांच्या प्रतिमेची पूजा व आरती करून पालखी सोहळ्यास सुरुवात करण्यात आली.
प्रतिमांचे पूजन रेनबो इंटरनॅशनल स्कूलचे अध्यक्ष नितीन काळभोर, व्यवस्थापिका मंदाकिनी काळभोर, किड्स कायझनच्या प्राचार्या ऐश्वर्या काळभोर, अक्षय काळभोर, स्कूलच्या प्राचार्या मीनल बंडगर, उपप्राचार्य प्रशांत लाव्हरे व पर्यवेक्षिका पायल बोळे यांच्या हस्ते करण्यात आले.
‘कानडा राजा पंढरीचा व विठ्ठलाच्या पायी वीट झाली भाग्यवंत ‘हे दोन अभंग व ‘विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा’ हे भजन शाळेचे संगीत शिक्षक शिवराज साने व संदीप शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सादर करण्यात आले. इयत्ता आठवीच्या वर्गातील विद्यार्थ्यांनी संत ज्ञानेश्वर यांच्या पाठीवर मुक्ताबाईनी भाजलेले मांडे असा जिवंत प्रसंग तसेच विविध संतांच्या भूमिका साकारण्यात आल्या. या सोहळ्यात विठ्ठलाच्या वेशभूषेत नैतिक थोरात व रखुमाईच्या वेशभूषेत सई तंदळकर हे विद्यार्थी होते.
शिक्षणाबरोबर खऱ्या अर्थाने महाराष्ट्राची परंपरा पूर्वपार चालवण्यासाठी मुलांवर वारकरी सप्रदायाचे संस्कार होणे गरजेचे आहे. हाच रेनबो इंटरनॅशनल स्कूलचा मानस आहे. या सोहळ्यात विद्यार्थ्यांनी वारकरी वेश परिधान करून आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलेले रिंगण पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी धरून विठुरायाचे नामस्मरण केले.
दरम्यान, या रिंगणामध्ये नृत्यशिक्षक अश्विन मनगुतकर यांच्या मार्गदर्शनाखाली टाळांच्या गजरात मन मंदिरात तुझीच आरसा’ या भक्ती गीतावर इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्यांनी ठेका धरला. चित्रकला शिक्षक दीपक शितोळे यांनी विठुरायाचे व संत तुकारामांचे काढलेले चित्र आकर्षणाचा केंद्र बिंदू ठरले. आसिफ शेख यांच्या मार्गदर्शनाखाली रिंगणामध्ये शाळेचा अश्व (कृष्ण) यावरून घोडस्वारी करत प्रांजल काळभोर, अनुष्का कामठे व दूर्वा बोळे यांनी रिंगणाला तीन फेऱ्या मारल्या. या रिंगणामध्ये विद्यार्थ्यांनी तसेच शिक्षक वर्ग व शिक्षकेतर कर्मचारी यांनी देखील फुगड्या खेळून पालखी सोहळ्याचा आनंद लुटला.