लोणी काळभोर : लोणी काळभोर (ता. हवेली) येथील विद्यार्थी व पालकांनी डिजिटल डिटॉक्स’, ‘नो स्क्रीन टाईम’ पाळण्याची प्रतिज्ञा आज शनिवारी (ता.१५) अकरा वाजण्याच्या सुमारास घेतली आहे. या उपक्रमाचे आयोजन लोणी काळभोर ग्रामपंचायत व राष्ट्रसेवा प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.
जगभरात दररोज सोशल मीडिया वापरणान्यांची संख्या २०१८ पर्यंत ३२६.१ अब्ज इतकी होती. २०२३ पर्यंत हा आकडा ४४८ अब्ज इतका वाढणार असल्याची शक्यता एका खाजगी सर्वेक्षणातून पुढे आली आहे. भारतातील नागरिक वर्षातील ७५ दिवस, तरुणाई दिवसातील ४-७ तास केवळ स्मार्टफोन वापरण्यात घालवतात असाही निष्कर्ष काढण्यात आला आहे. व्यतीत सोशल मीडियाचे व्यसन ही धोक्याची घंटा असून, डिजिटल डिटॉक्सिंग, नो स्क्रीन टाईम, नो स्क्रीन झोन हे उपाय वेगाने अवलंबण्याची गरज असल्याचे मत जाणकारांनी नोंदवले आहे.
लोणी काळभोर येथील विद्यार्थ्यांची मोबाईल पासून सुटका करून घेण्यासाठी लोणी काळभोर ग्रामपंचायत व राष्ट्रसेवा प्रतिष्ठान वतीने ‘डिजिटल डिटॉक्स’, ‘नो स्क्रीन टाईम’, या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पाकालांनी आणि विद्यार्थ्यांनी संध्याकाळी फोन, टीव्ही व आधुनिक साधनांचा संध्याकाळी सहा ते रात्री आठ वाजेपर्यंत वापर करणार नाही. अशी प्रतिज्ञा घेतली आहे.
यावेळी लोणी काळभोरच्या सरपंच माधुरी काळभोर, उपसरपंच भारती काळभोर, सदस्या ललिता काळभोर, नागेश काळभोर, माजी उपसरपंच राजेंद्र काळभोर, राष्ट्रसेवा फाउंडेशनचे अध्यक्ष कमलेश काळभोर, केंद्रप्रमुख राजेंद्र जगताप, माजी मंत्री सूर्यकांत गवळी, हवेली पंचायत समितीचे माजी उपसभापती सनी उर्फ युगंधर काळभोर, सविता वर्मा, प्रियंका ढम, शहनाज शेख, विशाल वेदपाठक, भाग्यश्री भिकुले, मुख्याध्यापिका मीना नेवसे मुख्याध्यापिका लता सोरटे, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, सोशल मीडिया हा आपल्या दैनंदिन जीवनाचा एक भाग बनला आहे आणि आपण या प्लॅटफॉर्मवर विनाकारण आपला वेळ वाया घालवत असतो. काही काम नसलं की फोन घेऊन पडून राहतो आणि सतत सोशल मीडिया चाळत बसतो. रोजरोज हेच काम केलं, की याची सवय लागते. ही सवय मोडण्यासाठी फोनपासून लांब राहणं किंवा फोन दूर ठेवणं आणि सोशल मीडिया अॅप्सचा वापर कमी करणं, याला डिजिटल डिटॉक्स म्हणतात.