विशाल कदम
लोणी काळभोर : लोणी स्टेशन येथील एका मेडिकल दुकानामधून कोल्ड्रिंक्स, चिप्सची विक्री रात्री अकरानंतर जोरदार सुरु आहे. लोणी काळभोर येथील एका नामांकित कॉलेजमधील तरुण व तरुणी चक्क ११ नंतरही दररोज मेडिकलमध्ये गर्दी करताना आढळून येत आहेत. तसेच, मेडिकलच्या शेजारीच उघड्यावर बसून दररोज रात्रीच्या दारूच्या पार्ट्या करत असल्याचे दिसून येत आहे.
अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहआयुक्त एस. बी. पाटील यांनी ११ फेब्रुवारी २०२२ रोजी काढलेल्या परिपत्रकात मेडिकल चालकांनी मेडिकलमधून गोळ्या औषधांव्यतिरिक्त इतर अन्न पदार्थ विक्री करू नये, अन्यथा विक्री करताना आढळल्यास किंवा दिलेल्या सूचनांचे पालन न केल्यास कायदेशीर कारवाई करणार असा कडक इशारा दिला होता. मात्र, मेडिकल चालकांनी शासनाच्या आदेशाला केराची टोपली दाखविली असून, राजरोसपणे अन्नपदार्थांची विक्री केली जात आहे. मेडिकल चालकाने उपस्थित राहून वैद्यकीय अधिकाऱ्यांनी नमूद केलेल्या यादीप्रमाणे गोळ्या व औषधे देणे बंधनकारक आहे. मात्र मेडिकलचालक दुसऱ्याच गोष्टीना प्राधान्य देत आहेत.
पुणे – सोलापूर महामार्गावरील पूर्व हवेलीतील कदमवाकवस्ती, लोणी काळभोर व उरुळी कांचन परिसरात १५० व त्यापेक्षा लहान व मोठी मेडिकल दुकाने आहेत. यामध्ये काही गावांमधील मेडीकल दुकाने ही अत्यावश्यक सेवेसह रात्री ११ वाजेपर्यंत सुरु असतात तर काही मेडिकल २४ तास सुरु असतात. लोणी स्टेशन येथील एका मेडिकल दुकानामधून आईसक्रीम, चॉकलेट्स, शीतपेय, आईस्क्रीम आणि चिप्सची विक्री रात्री अकरानंतरही जोरदार सुरु असते. सदर मेडिकलमधून विद्यार्थी कोल्ड्रिंक्स आणि चिप्स घेऊन पहाटेपर्यंत शेजारील परिसरात मद्यपान करतात.
सदर परिसरात हॉस्पिटल असल्याने येथे रुग्ण व नातेवाईकांनी ये-जा चालू असते. तरुण-तरुणी मद्यपान केल्यानंतर रस्त्यावरच आरडाओरडा करून धिंगाणा घालतात. रस्त्याच्या मध्यामागीच वाहने लावतात. त्यामुळे ही मेडिकल दुकाने आहेत का किराणा मालाची दुकाने असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. त्यामुळे अशा मेडिकलवर अन्न व औषध प्रशासन विभागाने कारवाई करण्याची मागणी नागरिक करू लागले आहेत.
दरम्यान, पुणे येथील अन्न व औषध प्रशासन विभागाकडून मेडिकल दुकानदारांना परवाना मिळतो, परंतु अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी या प्रकारच्या मेडीकल दुकानदारांवर कारवाईचा बगडा का उचलत नाहीत ? परवानाधारक कर्मचारी नियुक्त आहेत का नाही याचीही चौकशी करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येत आहे.
एकंदरीत या सर्व प्रकाराने ग्रामस्थ हैराण झाले असून या प्रकारांकडे पोलीस देखील कानाडोळा करत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे हे मेडिकलचालक शासकीय नियम हे धाब्यावर बसून आपल्या व्यवसाय रेटत असल्याचे चित्र परिसरात दिसून येत आहे.