लहू चव्हाण
पाचगणी : हवामानातील बदल, उशिरा लागवड आणि निकृष्ट रोपांची आवक यामुळे आगोदरच कंबरडे मोडलेल्या स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांना रानटी प्राण्यांनी आर्थिक संकटात टाकले आहे.
सध्या ढगाळ वातावरण, अवेळी पाऊस यामुळे स्ट्रॉबेरी उत्पादनावर परिणाम जाणवत आहे. उशिरा लागवड , आणि निकृष्ट रोपांची आयात यामुळे आगोदरच चिंताग्रस्त असणारा शेतकरी या संकटाने आणखीनच हवालदिल झाला आहे.
शेतकरी आर्थिक संकटात असताना रान गव्यानी गोळेवाडी, कासवंड येथील शेतकरी एकनाथ महादेव गोळे यांच्या स्ट्रॉबेरी शेतात हैदोस घालून शेतीचे नुकसान केल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. या परिसरात वन्य प्राण्यांचे कळपच्या कळप पिकाचे नुकसान करीत आहेत. काल रात्री एकनाथ गोळे यांच्या या शेतातील पाच ते सहा हजार स्ट्रॉबेरी रोपांचे शेतात रानटी गव्यानी हैदोस घातला. यामुळे या शेतकऱ्याचे सुमारे सहा लाखांचे नुकसान झाले आहे. सर्व शेतात धुमाकूळ घालून गव्यांच्या कळपाने रोपांचे आणि स्ट्रॉबेरिचे अतोनात नुकसान केले आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. वन विभाग मात्र याकडे लक्ष देत नसल्याने महाबळेश्वर तालुक्यातील शेतकरी वन विभागावर नाराज आहे. वन विभागाने या वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करावा आणि शासकीय पातळीवरून या नुकसानीची दखल घेऊन शेतकऱ्यांना भरीव नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी येथील शेतकऱ्यांनी केली आहे.