पुणे : वारजे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कर्वेनगर परिसरातून मौजमजेसाठी महागड्या सायकली चोरणाऱ्या दोघांना वारजे पोलिसांनी अटक केली आहे. शिवशंकर राजेंद्र जाधव (वय – 30, रा. कर्वेनगर) आणि अभिषेक प्रकाश जाधव (वय – 24, रा. कर्वेनगर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून पोलिसांनी 30 सायकली जप्त केल्या आहेत.
वारजे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वारजे माळवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत सायकल चोरीच्या घटना घडल्या होत्या. या पार्श्वभूमीवर वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोज शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने तपास सुरु केला. यावेळी पोलीस अंमलदारअमोल सुतकर यांना एका खबऱ्याकडून माहिती मिळाली की, कर्वेनगर परिसरातील दोघेजण चोरीच्या सायकल वापरत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, पथकाने सापळा लावून शिवशंकर आणि अभिषेक यांना ताब्यात घेतले त्यांच्याकडे त्यांचे नाव विचारले असता त्यांनी वरीलप्रमाणे त्यांची नावे सांगितली. त्यांच्याकडील एक सायकल वारजेतील शोभापूरम सोसायटीच्या आवारातून चोरी गेलेली सायकल असल्याचे स्पष्ट झाले. त्यांच्याकडे चौकशी केल्यावर त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, पोलिसी खाक्या दाखविताच त्यांनी सायकली चोरल्याची कबुली दिली. पोलिसांच्या पथकाने त्यांच्याकडून 30 सायकल जप्त केल्या. या सायकल त्यांनी गेल्या दीड वर्षांत चोरल्याची माहिती पोलिसांना दिली.
दरम्यान, आरोपी शिवशंकर आणि अभिषेक दोघेही कर्वेनगर भागात राहण्यास आहेत. मिळेल ते काम करून ते उदरनिर्वाह करतात. मौजमजेसाठी दोघांनी मिळून सायकली चोरल्या. त्यांनी सायकलची विक्री करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना यश आले नाही. त्यामुळे या सायकल तशाच पडून होत्या. सदरची कामगिरी पोलिस उपायुक्त संभाजी कदम यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोज शेडगे, गुन्हे निरीक्षक निळकंठ जगताप, उपनिरीक्षक रामेश्वर पार्वे, अंमलदार प्रदीप शेलार, मनोज पवार, संभाजी दराडे, विकास पोकळे, अमोल सुतकर यांच्यासह पथकाने केली आहे.