दीपक खिलारे
इंदापूर : विकासधारा मंचच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय ग्रामविकास कृषी प्रदर्शनास शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे आयोजिका सीमा कल्याणकर यांनी सांगितले.
बुधवार (ता. २३) रोजी पासून सुरू झालेल्या कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन इंदापूर नगरपरिषदेच्या माजी नगराध्यक्षा अंकिता मुकुंद शहा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अॅड.राहुल मखरे, रोटरी क्लबचे अध्यक्ष नरेंद्र गांधी, राष्ट्रीय सरपंच परिषदेच्या इंदापूर तालुका संघटक अनिता खरात आदी मान्यवर उपस्थित होते.
यंदाच्या ग्रामविकास कृषी प्रदर्शनात अग्रोवन पुरस्कारप्राप्त अथर्व हायटेक नर्सरीच्या माध्यमातून तालुक्यातील शेतकऱ्यांना स्थानिक वातावरणात लागवडीस उपयुक्त सफरचंदाच्या लागवडीबरोबरच चाॅकलेट बनविण्यासाठी आवश्यक असणारे फणस, आवळा व टारकोट यांची प्रक्रिया उभारणी, गुजराती केशरी आंबा, तैवान पिंक पेरू, थाई चिंच अशा विविध प्रकारच्या रोपांची लागवड विषयक परिपूर्ण माहिती शेतकऱ्यांना या प्रदर्शनाच्या माध्यमातून मिळत आहे. त्याचबरोबर प्रदर्शनात गृहोपयोगी वस्तू, खाद्याचे स्टाॅलची उभारणी करण्यात आली आहे. या स्टॉलला देखील गृहीणी, खवय्ये यांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे सीमा कल्याणकर यांनी सांगितले.
प्रदर्शनास शेवटचे दोनच दिवस उरले असून प्रदर्शनास भेट देणाऱ्या शेतकऱ्यांची, नागरिकांची, विद्यार्थी वर्गांची गर्दी वाढेल असा विश्वासही सीमा कल्याणकर यांनी व्यक्त केला.