युनूस तांबोळी
Special Article : आज जागतिक जेष्ठ नागरिक दिन… अनुभवाची शिदोरी असणारी ज्येष्ठ व्यक्ती घरातलं घरपण टिकवून ठेवणारी असते. कुटूंबव्यवस्थेतील त्यांचे योगदान मोलाचे असते. कुटुंबासाठी त्यांनी केलेला त्याग लक्षात ठेवला पाहिजे. ज्येष्ठत्व आल्यावर नकारात्मक भूमिका घेऊन त्यांचा कंटाळा, रागराग होता कामा नये. कुटूंबामध्ये राहणे हा प्रत्येक ज्येष्ठ नागरिकांचा अधिकार आहे. त्यांच्या गरजा फक्त अन्न, वस्त्र, निवारा यापुरत्या मर्यादीत नाहीत; त्यांना कुटुंबातील व्यक्ती म्हणून स्विकार, सहकार्य, सुरक्षा आणि सन्मान दिला गेला पाहिजे. चला… जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त ज्येष्ठांना मायेचा हात देऊया…
ज्येष्ठांची वयोमर्यादा वाढली
जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन म्हणून १ ऑक्टोबर हा दिवस साजरा केला जातो. यादिवशी ज्येष्ठांच्या समस्यांचा गांभीर्याने विचार केल्यास खऱ्या अर्थाने हा दिन साजरा केल्याचे फलित होईल. आजकाल वैज्ञानिक संशोधन, आधुनिक उपचारपद्धती, आर्थिक सुबत्ता या कारणाने ज्येष्ठांची वयोमर्यादा वाढलेली पहावयास मिळते. (Special Article) त्यामुळे समाजात ज्येष्ठ नागरिकांची संख्या देखील वाढली आहे. पण वाढत्या संख्येने ज्येष्ठ नागरिकांच्या अनेक समस्यांनाही जन्म दिला आहे.
सन्मानाची वागणूक मिळण्याची अपेक्षा
ज्येष्ठ व्यक्ती ही त्या कुटुंबातील कधी काळी कर्तबगार व कुटूंब चालवणारी असते. अनेक उन्हाळे-पावसाळे खाऊन त्यांनी कुटुंबाची जबाबदारी पेलवलेली असते. पण वार्धक्य आले की त्यांच्या समस्या देखील वाढू लागतात. हे कुटुंबातील तरुणाईने लक्षात घेतले पाहिजे. आर्थिक, सामाजिक, शारीरिक आणि मानसिक अशा स्वरूपाच्या समस्यांना त्यांना सामोरे जावे लागते. शरीराच्या व्याधी मागे लागतात. (Special Article) त्या परिस्थितीत त्यांना खरी आधाराची गरज असते. मात्र, सध्या समाज, कुटूंब व शासनस्तरावरही ज्येष्ठांची थट्टा होताना पहावयास मिळते. ज्येष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधून, त्यांना सन्मानाची वागणूक मिळेल, असे काही करणे ही काळाची गरज आहे.
शासनस्तरावर उपाययोजना
साठी उलटली की ज्येष्ठांच्या समस्या अधिक जटील होतात. पैसा खर्च करण्याचा अधिकार नसतो. मुलांनी अथवा कुटूंबाने सर्व मालमत्ता नावावर करून घेतलेली असते. आयुष्यभर कुटूंब उभे करण्यासाठी राबलेल्या ज्येष्ठांना आधार मिळत नाही. अशा ज्येष्ठांना वृद्धाश्रमात लोटण्याचे धाडस होत असल्याचे दिसून येते. (Special Article) अन्न, वस्त्र, निवारा किंवा आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागणाऱ्या या ज्येष्ठांना शासन स्तरावर उपाययोजना करण्याची गरज आहे.
पदयात्रा, प्रभात फेऱ्या, सभांचे आयोजन
राज्यात ज्येष्ठ नागरिक दिवस साजरा होत आहे. याबाबत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने परिपत्रक काढले आहे. राज्यात सर्व जिल्हाधिकारी, स्थानिक स्वराज्य संस्था, शासकीय- निमशासकीय कार्यालये, महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषदांमार्फत राज्यात जागतिक ज्येष्ठ नागरिक दिवस आयोजित करण्यात येणार आहे. (Special Article) या दिनानिमित्त ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष कार्यक्रम, उपक्रम राबविण्यात यावे. ज्येष्ठ नागरिक दिवसानिमित्त सार्वजनिक पदयात्रा, प्रभात फेऱ्या, सभा, विशेष कार्यक्रम, विशेष कार्य केलेल्या ज्येष्ठांचा व ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात यावा. त्यांच्यासाठी आरोग्य शिबिर, चर्चासत्र आयोजित करण्यात यावीत.
कुटूंबाची भूमिका महत्त्वाची
ज्येष्ठांच्या जीवनमानाचा अनुभव म्हणजे त्यांचा आदर्श घेण्यासारखा असतो. मात्र, त्यांनाच समाज किंवा कुटूंबाकडून अनेकदा योग्य वागणूक मिळत नाही. सध्या अनेक ज्येष्ठ वेगवेगळ्या व्याधींनी त्रस्त आहेत. त्यांना सहानभुतीपूर्वक वागणूक देऊन त्यांच्या व्याधींवर उपाययोजना केल्या पाहिजेत. (Special Article) शासनाने अनेक रूग्णालयांतून ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत आरोग्यसेवा उपलब्ध करून दिल्या आहेत. पण कुटूंबाने त्यांना जबाबदारीने या उपाययोजना मिळवून दिल्या पाहिजेत.डॉ. निखील इचके, वैद्यकीय अधिकारी, वायसीएम, पुणे
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : पुण्यात आठ महिन्यांत १४ हजार ७२ नागरिकांना श्वानदंश
Pune News : हंगामाच्या समाप्तीला पुण्यात मेघगर्जनेसह पाऊस बरसणार
Pune News : प्रेयसीशी लगट करत असल्याच्या संशयावरून तरुणाचा खून; आरोपीला जन्मठेप