पुणे : परदेशातून आणलेले अंमली पदार्थ (एम.डी. ड्रग्ज) तस्करी करणाऱ्या आंतरराष्ट्रीय रॅकेटचा गुन्हे शाखा युनिट-१ च्या पोलिसांनी पर्दाफाश केला. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे.
वैभव ऊर्फ पिंट्या भारत माने, अजय आमरनाथ करोसिया (वय ३५, व रा. दोघेही पुणे), हैदर नूर शेख, (वय-४०, रा. विश्रांतवाडी, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नाव आहेत. यातील माने व करोसिया हे रेकोर्डवरील अट्टल गुन्हेगार आहेत. त्यांच्याकडून पोलिसांनी ३ कोटी ५८ लाख २८ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखा युनिट-१ कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद, त्यांच्याकडील अधिकारी व अंमलदार रात्रीच्या वेळी हद्दीत गस्त घालीत असताना, पोलीस अंमलदार विठ्ठल सांळुखे यांना त्यांच्या बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, सोमवार पेठ (पुणे) येथे समोर एक पांढऱ्या रंगाची गाडी असून, रेकॉर्डवरील आरोपी वैभव उर्फ पिंटया माने व आणखी एक साथीदार गाडीत संशयितरीत्या बसले आहेत. त्यानुसार युनिट-१ कडील अधिकारी व स्टाफने त्याठिकाणी जाऊन कारची पाहणी केली असता, माने याच्यासह गाडीत १ कोटी रुपयांचा ५०० ग्रॅम वजनाचा मेफेड्रॉन (एम.डी.) हा अंमली पदार्थ आढळून आला. या वेळी चालक अजय करोसिया यांना जागीच ताब्यात घेण्यात आले. दोन्ही आरोपींकडे अधिक चौकशी केली असता, वैभव माने याला हैदर शेख याने काही वेळापूर्वी एम.डी. दिल्याचे सांगितले.
गुन्हे शाखेचे पोलीस हैदर शेख याचा तपास करीत असताना आरोपी हा विश्रांतवाडी परिसरात आढळून आला. त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे १ कोटी रुपयांचे अंमली पदार्थ व एक घराची चावी आढळून आली. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता, विश्रांतवाडी, परिसरात असलेल्या एक पत्र्याचे गोडाऊन असल्याचे समजले. पोलिसांनी त्याठिकाणी जाऊन पाहणी केली असता, १ कोटी ५० लाख रुपयांचे एमडी गोडाऊनमध्ये आढळून आले. तसेच २०० ते ३०० संशयास्पद पोती आढळून आली. त्यामध्ये मीठ असल्याचे आढळून आले आहे. परंतु सर्व पोत्यांमध्ये एम.डी. आहे किंवा नाही याबाबत गुन्हे शाखेचे अधिकारी व कर्मचारी तपासणी करीत आहेत.
दरम्यान, हैदर शेखकडे मेफेड्रॉन अंमली पदार्थ कोणाकडून आणला, याबाबत विचारणा केली असता, त्याने एम.डी. अंमली पदार्थ हा परदेशी नागरिक यांनी मला विक्रीसाठी दिल्याचे सांगितले. पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली असून, त्यांच्याकडून २ मोबाईल फोन, गुन्ह्यात वापरलेली चारचाकी गाडी, दोन आरोपींकडून जप्त केलेला २ कोटींचे अंमली पदार्थ व गोडावूनमधील १ कोटी ५० लाखांचा मुद्देमाल असा ३ कोटी ५८ लाख २८ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ही कामगिरी गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद, अजय वाघमारे, राजेंद्र लांडगे, अनिता हिवरकर, विनायक गायकवाड, सपोनि बाबर, गायकवाड, पोलीस उप निरीक्षक रमेश तापकीर, शेळके, गोरे, कोळेकर, मगदूम, देव, नाईक, जाधव, शिंदे, मोकाशी, पोलीस अंमलदार विठ्ठल सांळुखे, अभिनव लडकत, दता सोनावणे, निलेश साबळे, राहुल मखरे, अनिकेत बाबर, शशिकांत दरेकर, शुभम देसाई, शंकर कुंभार, आय्याज दड्डीकर, सुजित वाडेकर, संतोष देशपांडे, निखिल जाधव यांनी केली आहे.